पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, 'गिरीजाघर' आणि 'पुराण'..

By Admin | Published: March 15, 2016 09:25 AM2016-03-15T09:25:28+5:302016-03-15T09:27:29+5:30

सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली

Portuguese's foothills, 'Girijaar' and 'Puran' .. | पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, 'गिरीजाघर' आणि 'पुराण'..

पोर्तूगीजांच्या मुंबईतील पाऊलखुणा, 'गिरीजाघर' आणि 'पुराण'..

googlenewsNext
>मुंबई, दि. १५ -  सोळाव्या शतकाच्या प्रारंभी मुंबईच्या इतिहासाच्या रंगमंचावर पोर्तुगीजांचा प्रवेश झाला आणि मुंबई खऱ्या अर्थाने जागतिक नकाशावर उगम पावायला सुरूवात झाली. शेवटचा गुजराथी सुलतान बहादूरशहा याने उत्तरेकडून मोगलांचे दडपण व दक्षिणेत वाढणारे पोर्तुगीजांचे आक्रमक सामर्थ्य या पेचातून अंशत: मोकळे होण्यासाठी सोळाव्या शतकाच्या मध्यावर मुंबई आणि वसई ही दोन समुद्राकाठची ठिकाणे पोर्तुगीजांच्या हवाली केली. सन १५३४ साली मुंबई पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली ती त्यांच्या ताब्यात १६६१ पर्यंत होती. 
दर्यावर्दी पोर्तुगीज जरी व्यापाराच्या निमित्ता आले असले, तरी त्यांचा मुख्य उद्देश येथील स्थानिकांना बाटवून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हा होता. त्यामुळे मुंबईच्या नैसर्गिक बंदराच्या असण्याचा व्यापारासाठी म्हणावा तसा उपयोग पोर्तुगीजांनी केला नाही. माहीम–वसई परिसरातील स्थानिकांना येनकेनप्रकारेण बाटवून त्यांना ख्रिश्चन करणे हा त्यांचा मुख्य धंदा होता. येथील राज्यकारभारात पोर्तुगीज शासकांपेक्षा त्यांच्या धर्मगुरूंचा जास्त पगडा होता. मुंबई माहीम-वांद्रे किंवा वसई भागात जे बहुसंख्येने ख्रिश्चन दिसतात ते या तेंव्हाच्या पोर्तुगीज प्रभावामुळेच. हे स्वत:ला 'इस्ट इंडीयन ख्रिश्चन' म्हणवतात. 
कोणीही परकीय धर्मप्रसारक सत्ता करते त्याप्रमाणे पोतुगीजनीही आक्रमक धर्मप्रसार करताना येथील काही देवळे व मशिदी पडून त्या जागेवर चर्चेस उभारण्याचा पवित्रा घेतला. माहीमचे सेंट मायकेल  चर्च, अंधेरीचे सेंट जॉन द बाप्टीस्ट चर्च (सध्या हे चर्च अंधेरी येथील सीप्झ संकुलाच्या आत आणि पडीक अवस्थेत आहे.), भायखळ्याचे ग्लोरिया चर्च, दादरचं पोर्तुगीज चर्च, वांद्रे येथील 'माऊंट मेरी' पोर्तुगीजांचीच देन आहे. ही सर्व ठिकाणं आजही सुस्थितीत असून आणि सर्वाना पाहता येतात. या व्यतिरिक्त आताच्या ताज लॅण्ड्स एंड (किंवा हॉटेल सी रॉक येथे) या ठिकाणी अजूनही असलेला वांद्र्याचा किल्ला, धारावीचा किल्ला, मालाडच्या मढ येथील सध्या वायूदलाच्या ताब्यात असलेला वर्सोव्याचा किल्ला किंवा मुंबईचा प्रसिद्ध ‘फोर्ट’ (आता फक्त नाव, आपण ज्याला इंग्रजांचा ‘फोर्ट विभाग’ म्हणून ओळखतो, तो किल्ला मुळात पोर्तुगिजांचा होता.) या पोर्तुगेजांच्या खुणा अजूनही मुंबईत शिल्लक आहेत. काल-परवापर्यंत दहिसरच्या नदीवर एक पोर्तुगीजकालीन सुस्थितीत असलेला अप्रतिम ब्रीज होता, तो विधी-निषेधशुन्य राजकारण्यांनी तोडून त्याजागी राजकारण्यांनी, त्यांचं थडगं म्हणता येईल अशा अत्यंत कुरूप पुलाचं 'निर्माण' करून ठेवलं आहे.
पोर्तुगीज सत्तेचे आंधळे धार्मिक स्वरूप वजा केल्यास त्यांच्या कित्येक गोष्टी त्या कालच्या इथल्या लोकांनी स्वीकारल्या. साहेबी पोषाखाचा स्विकार मुंबईकरांनी करण्यास येथून सुरूवात झाली. मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात ‘पावा’चा शिरकाव झाला तो यांच्यामुळेच. विहिरीत ‘पाव’ टाकून ते पाणी स्थानिकांना पिण्यास देऊन त्यांना सामुहिकपणे बाटवण्याचा उद्योग पोर्तुगीजांनी मोठ्या प्रमाणावर केला. आणि म्हणून इथल्या ख्रिश्चनांना आजही आपण ‘पाववाले’ म्हणून ओळखतो. पोर्तुगीजांनी आपल्या भाषेत एक नविन शब्द रूढ केला, 'गिरीजाघर'..!! चर्चला हिन्दी भाषेत 'गिरीजाघर' असं म्हणतात. पोर्तुगीज भाषेत चर्चला 'Igreja (इग्रेजा)' असा शब्द आहे. स्थानिकांनी या 'इग्रेजा'चा सोप्पा उच्चार 'गरेजा-गिरीजा' असा केला व पुढे जाऊन 'चर्च' म्हणजे 'गिरीजाघर' असा शब्द कायम झाला..
जाता जाता-
पोर्तुगीज सत्तेचा मुंबई व परिसरातील वावर व्यापारापेक्षा धर्मप्रसारासाठी जास्त होता..Igrejaचं झालेलं 'गिरीजा' भाषांतर पोर्कुगीजांच्या पथ्यावरच पडलं असावं..गिरीजा हे पार्वतीचं नांव..! इथल्या स्थानिकांना ख्रिस्ती धर्म जबरदस्तीने किंवा नाईलाजाने स्वीकारताना 'गिरीजा' हे नांव काहीसं आश्वासक वाटलं असावं. सर्वच धर्मांना व त्यांच्या देवताना भाबड्या भाविकतेने पुजणाऱ्या मुळच्या हिंदू मानसिकतेने 'गिरीजे'चं घर स्विकारून आतल्या मेरीला 'मावली' मानलं असणं शक्य असल्याचं नाकारता येत नाही. पार्वतीचं हे नवं रुपडं त्यांनी स्वीकारलं. वांद्र्याच्या 'माऊंट मेरी'चं आपण हिन्दूंनी केलेलं 'मोत मावली' हे नामकरण याच मानसिकतेतून झालेलं आहे.
सन १६१६ मध्ये इंग्लिश धर्मप्रसारक फादर थॉमस स्टीफन्स यांनी पोर्तुगीज शासकत्वाखाली असलेल्या गोव्यात ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी येशू ख्रिस्ताची चरीत्र सांगणारे 'ख्रिस्त पुराण' हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले. 'गिरीजा', 'मावली' हे स्विकारणाऱ्या स्हिन्दूंच्या मानसिकतेचा बारकाईने अभ्यास केलेल्या या मिशनऱ्याने, येशुचं महात्म्य तेथील हिन्दूंच्या मनावर ठसवण्सासाठी आपल्या पुस्तकासाठी 'पुराण' या हिन्दू मनावर कोरल्या गेलेल्या शब्दाचा वापर मोठ्या हुशारीने करून या पुराणाची रचना आपल्या रामायण, महाभारतादी रचनांप्रमाणेच केली होती. हिंदूनीही 'गिरीजा', 'मावली' प्रमाणे ख्रिस्ताला स्विकारले ते या 'पुराण' शब्दामुळे..
- गणेश साळुंखे
संदर्भ -
१. मुंबईचे वर्णन - सन १८६३ - गो.ना.माडगांवकर
२. मुंबई नगरी -सन १९८२ - न.र.फाटक
३. जागर-नरहर कुरूंदकर

Web Title: Portuguese's foothills, 'Girijaar' and 'Puran' ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.