‘मेगा रिचार्ज स्कीम’बाबत सकारात्मक हालचाली!
By admin | Published: January 11, 2016 01:50 AM2016-01-11T01:50:26+5:302016-01-11T01:50:26+5:30
हवाई पाहणी; केंद्रीय मंत्री उमा भारती, मुख्यमंत्र्यांकडून आढावा.
खामगाव/संग्रामपूर (जि. बुलडाणा) : विदर्भातील खारपाणपट्टय़ासह खान्देश आणि मध्य प्रदेशातील सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने 'मेगा रिचार्ज स्कीम'अंतर्गत धारणीनजीक उभारण्यात येणार्या खारिया-घुटीघाट डायव्हर्शन वेअर प्रकल्पाच्या कामकाजाची केंद्रीय मंत्री उमा भारती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी हवाई पाहणी केली. खान्देशातील अनेर धरण मार्गे लोहारा प्रकल्प आणि तेथून मध्य प्रदेशातील खंडवा पर्यंंंतच रविवारी पाहणी करण्यात आली. त्यामुळे राज्य शासनही प्रकल्पाबाबत सकारात्मक पावले उचलत असल्याचे संकेत मिळाले. पाणी लवादासंदर्भात या प्रकल्पामध्ये कुठलीही अडचण येणार नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. ५ हजार ४२८ कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारचा संयुक्त उपक्रम असून, ही मेगा रिचार्ज स्कीम शाश्वत शेती सिंचनाच्या दृष्टीने व्यवहार्य असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याची माहिती पाटबंधारे विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.