सकारात्मक विचारांची ‘रियुनियन’!

By Admin | Published: January 24, 2016 12:24 AM2016-01-24T00:24:10+5:302016-01-24T00:24:10+5:30

अपेक्षांचं ओझं वाढायला लागलं की, भावनांचे पाश घट्ट व्हायला लागतात आणि भीती वाटते ती अपयशाची. मग ती वाढत चाललेली ‘जीवघेणी स्पर्धा’ खऱ्या अर्थाने जीवघेणी ठरते.

Positive Thinking 'Reunion'! | सकारात्मक विचारांची ‘रियुनियन’!

सकारात्मक विचारांची ‘रियुनियन’!

googlenewsNext

(महिन्याचे मानकरी)
- पराग कुलकर्णी

अपेक्षांचं ओझं वाढायला लागलं की, भावनांचे पाश घट्ट व्हायला लागतात आणि भीती वाटते ती अपयशाची. मग ती वाढत चाललेली ‘जीवघेणी स्पर्धा’ खऱ्या अर्थाने जीवघेणी ठरते. अशा वेळी संतांचे विचार उपयोगी पडतात. ‘आध्यात्मात आपल्यापेक्षा वरच्याकडे बघावं आणि प्रपंचात आपल्यापेक्षा खालच्याकडे नजर असावी.’ पण, कोण लक्ष देतो त्या विचारांकडे? स्वत:चं दु:ख विसरून समाजासाठी ‘पसा’एवढं ‘दान’ मागायला काय जिगर लागते हे आपल्याला कुठे जाणून घ्यायचं असतं. विद्यार्थी असो किंवा धनाढ्य असामी निराशेच्या गर्तेत सापडलेली जी कुणी व्यक्ती आपल्या सान्निध्यात येते त्याला त्या गाण्याची पहिली ओळ गुणगुणून ऐकवा.. ‘छोडो कल की बाते.. कल की बात पुरानी..’ आयुष्यात यू टर्न नसतो, हा निष्कर्ष खोडून काढायला हवा.

‘छोडो कल की बाते, कल की बात पुरानी, नये दौर मे लिखेंगे, मिलकर नयी कहांनी..’ रेडिओवर गाणं सुरू होतं ! चित्रपट आठवत नव्हता, पण सुनील दत्त नावाचा कलाकार या गाण्यात आहे हे ठळकपणे आठवत होतं. गाडी एक्स्प्रेस-वेवर सुसाट पळत होती. ‘स्पीड लिमिट ८०’चे बोर्ड १२०च्या वेगाने मागे जात होते. खरं तर, या सूचना पाळण्यासाठी नाही, तर तोडण्यासाठी असतात हे संस्कार तरुण वयात जवळ जवळ प्रत्येकावर झालेले असतात, आणि तेच संस्कार आपल्याला चिरतरुण ठेवत असल्याचा ‘गैरसमज’ समज म्हणून शेवटपर्यंत आपल्यासोबत राहतो. असो, कार बोगद्यात शिरल्यावर रेडिओ बंद झाला, पण या गाण्यानं मला भूतकाळात नेऊन शाळेच्या स्नेहसंमेलनात उभं केलं. सामूहिक गायनात आम्ही हे गाणं म्हटलं होतं. आज तीच बॅच जवळ जवळ २० वर्षांनी परत एकदा भेटणार होती. ‘रियुनियन’ का काय ते म्हणतात ना तेच होणार होतं.
मला आठवत होता तो नववीमधला एक प्रसंग. एका मित्राचे वडील आम्ही ९वीत असताना वारले. काय वय असतं ते? पुढल्या वर्षी १०वी. त्याची परिस्थिती खूप गरीब. त्या वर्षी तो मागे राहिला; आम्ही पुढे गेलो. नंतर जेव्हा जेव्हा मी त्याला बघितला तेव्हा तेव्हा तो कधी पेपरची लाइन टाकत होता, तर कधी दुधाच्या पिशव्या टाकत होता. मी त्याला २० वर्षांनी भेटलो. प्रतिकूल परिस्थितीशी त्याने दिलेली झुंज ऐकली आणि अवाक् झालो ! तीन ते चार वेळा त्याने आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला. सोप्पं नव्हतं ते. कुणी मागे खेचलं त्याला? कुठलं श्रद्धास्थान होतं त्याचं ज्याने त्याला जगण्याची शक्ती दिली? खरं सांगू, त्याला रोखण्यापेक्षा खच्चीकरण करणारी माणसंच त्याला जास्त भेटली. त्या वेळी कुठलाही सरकारी फलक त्याच्या समोर नव्हता, जो त्याचा आत्महत्येचा विचार रोखू शकेल. त्याला थांबवायला मीही नव्हतो त्याच्या जवळ; आणि असतो तरी काय केलं असतं? आपण कितीतरी प्रसंगी आपली प्रतिक्रिया देताना बोलून जातो, ‘अरे मी पाहिजे होतो तिकडे.’ आता ‘तिकडे’ म्हणजे ‘कोपऱ्यात’ हे स्वत:लाही माहीत असतं आणि ‘तिकडे कोपऱ्यात’ असतो तर काय केलं असतं? मोबाइलवर ‘त्या’ प्रसंगाचं चित्रीकरण केलं असतं आणि ते सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करून जास्तीत जास्त ‘हिट्स’ मिळवले असते. कधी-कधी वाटतं समाजातील दुर्दैवी प्रसंग चित्रित करून, ते सोशल साइटवर अपलोड करून ‘हिट्स’ मिळवणारी मंडळी आणि माशीपासून ते समुद्रातील माशांपर्यंत कुणाचाही मृत्यू ओढवला, तरी त्या मृतदेहावर स्वत:च्या राजकीय पक्षाचा ध्वज अंथरणारी राजकीय मंडळी हे एकाच माळेतील मणी आहेत.
माझा एक साधा प्रश्न आहे. आपल्या जवळच कुणीतरी स्वत:चं आयुष्य संपवत आहे किंवा येत्या काही दिवसांत संपवणार आहे. याबद्दल आपल्याला काहीच कशी कल्पना येत नाही? आणि आपण त्या व्यक्तीला ‘आपला’ कसं मानतो? काय ठोकताळे बांधतो आपण ‘आपला’ या शब्दाच्या व्याख्येचे? दुसऱ्याच्या आयुष्यातल्या अशा किती गोष्टी आहेत ज्या आपल्याला समोरच्या व्यक्तीने न सांगता कळतात. परीक्षेत कमी पडलेले मार्क, दोन मार्कांनी हुकलेले अ‍ॅडमिशन, मैत्रिणीशी झालेलं भांडण, बॉसने वाढवून दिलेलं टार्गेट, शाळेच्या पी.टी.ए. मिटिंगमध्ये समजलेले मुलांचे प्रताप, लोनसाठी मागे लागलेला तगादा. आनंदापेक्षा समोरच्याला दु:खं झालं आहे हे आपल्याला चटकन समजतं. कारण जगात आपल्यासारखा सुखी कुणीच नसतो हा आपला अहंकार असतो. मग त्याच व्यक्तीच्या सद्विवेक बुद्धीचा नाश झाला आहे आणि ती व्यक्ती आता स्वत:चे आयुष्य संपवणार आहे हे त्याने न सांगता आपल्याला समजत नाही? किंवा आपण अहंकाराचे कवच ओढूनच जगत असतो. आपल्या सोयीनुसार नातं ठेवण्याची आजकालची जी फॅशन आलीये, तसंच काहीतरी जगण्यात आपण धन्यता मानतो आणि मग जवळची व्यक्ती जग सोडून गेली की, हळहळ व्यक्त करतो आणि रस्त्यावर उतरून निदर्शने करतो.
आत्महत्या जर सामाजिक गुन्हा असेल, तर त्याची शिक्षा ‘त्या’ एकट्याला नाही, तर समाजालाही व्हायला हवी. जो समाज आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला ‘त्या’ स्थितीपर्यंत जाण्यापासून परावृत्त नाही करू शकत त्या समाजाला दोषी का नाही मानायचं? वाईट याचेच वाटते की, आत्महत्येची जाहिरात करणे ही जी ‘कला’ आज आत्मसात करण्यात आली आहे त्यावर कुणाचाही आक्षेप नाही. सगळेच आले त्यात. आई-वडील, नातेवाईक, मित्र आणि नंतर चर्चा करणारे विचारवंतही. मुलाच्या जन्मापासून आपण त्याला काय बनवायचं याची चर्चा करतो. का? आपल्या मुलाला पेरू आवडत असतात; पण आपण त्याला संत्री खायला घालतो. का? कारण ती आपल्याला आवडत असतात. परिणाम? आधी विचारांची हत्या; आणि मग आत्महत्या! आपल्याला जे हवं ते आपल्या मुलांनी करावं हा हट्ट साथीच्या तापासारखा पसरला आहे. तो इतका पसरला आहे की मला तर कावळे, मांजरी, कुत्रेदेखील त्यांच्या पिल्लांना अशीच जबरदस्ती करताना दिसायला लागले आहेत.
भीती आणि नैराश्य या दोन भावना मनुष्याच्या मनाने निर्माण केल्या आहेत. त्या निसर्गाने आपल्याला दिल्या नाहीत. या भावनांचा भस्मासुर आज ‘आत्मा’ मारत आहे आणि विचारांची ‘हत्या’ करत आहे. ह्या नकारात्मक भावनांशी एकजुटीनं लढायचं असतं. मी माझं स्वत:चं उदाहरण आज समोर ठेवतो. १२वीच्या परीक्षेत मला बसू दिलं नाही. तीच गत शेवटच्या वर्षाला झाली. मी निराशेच्या गर्तेत इतका अडकलो की माझं पदवी शिक्षण मला अर्धवट सोडावं लागलं. मी पदवीधर नाही हा शिक्का कपाळी बसला; आणि आरशात तो मला नेहमीच उलटा दिसला. हे सगळं घडण्यामागे त्या वेळचं सरकार होतं? की कुठला सावकार होता? नंतरची तब्बल १० वर्षे मी काय जगलो हे माझं मलाही आठवत नाही. पण एक सांगतो, त्याची आठवण ठेवणारे माझे मित्र आजही माझ्यासोबत आहेत. ज्यांनी मला चित्रित करून माझी ‘ती’ अवस्था सोशल साइटला विकली नाही. त्यांनी मला जगवलं. जगणं सोप्पं आहे; पण जगवणं कठीण हे तेव्हा मला समजलं. आज गरज आहे जगवण्याची. आजचं राजकारण ‘इश्यू’ आधारित आहे की ‘जाती’वर आधारित आहे हा दळणाचा विषय आहे.
ती चक्की वर्षानुवर्ष आपल्याला दळत आहे. निराशेचा वणवा कुठलं सरकार पेटवतं हा विषय बाजूला ठेवू. काटा रुतला म्हणजे गुलाबाचा रंग आणि गंध वाईट असतो हा विचार चुकीचा आहे. आज गरज आहे अशा सकारात्मक विचारांच्या ‘रियुनियन’ची! सामूहिक विचारांची शक्ती अचाट आणि अफाट आहे. ती वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवा. अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नसून ती सुरुवात आहे हे मी स्वत:च्या अनुभवावरून सांगतो.
(लेखक हे डोंबिवली फास्ट, गैर, पोर बाजार, सांगतो ऐका, बाबांची शाळा, असामी असामी, मुंबई-पुणे-मुंबई अशा सुपरहिट सिनेमांचे आणि लागी तुझसे लगन, इस देस ना आना लाडो, जुनून व लक्ष्य, देवयानी, पोलीस फाइल्स, युनिट 9, त्यांच्या मागावर, सात जन्माच्या गाठी, या सुखांनो या, रेशीम गाठी यांसारख्या हिंदी-मराठी मालिकांचे लेखक आहेत.)

Web Title: Positive Thinking 'Reunion'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.