एलटीटीईच्या माजी हस्तकाला घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2016 08:50 PM2016-09-01T20:50:58+5:302016-09-01T20:50:58+5:30
(एलटीटीई) या दहशतवादी संघटेनच्या माजी हस्तकाला लोहगाव विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिका-यांनी पकडले
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 1 - श्रीलंकेमधील लिबरेशन टायगर्स आॅफ तमिळ इलम (एलटीटीई) या दहशतवादी संघटेनच्या माजी हस्तकाला लोहगाव विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिका-यांनी पकडले असून त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सध्या हा हस्तक सक्रिय नसला तरी सावधगिरी म्हणून त्याच्याकडे कसून चौकशी सुरु करण्यात आली आहे. बनावट पासपोर्ट आणि व्हीसाच्या आधारे तो जर्मनीला जात असल्याचा संशय पोलिसांना आहे.
सुथान सुप्पाय्या उर्फ मारिमुथू राजू (रा. त्रिनूवेल्ली पूर्व, जाफना, श्रीलंका) असे त्याचे नाव आहे. तो बुधवारी सकाळी चेन्नईहून रेल्वेने पुण्याला आला. गुरुवारी रात्री उशीरा तो लोहगाव विमानतळावर गेला होता. लुफ्थांसा कंपनीच्या विमानाने तो जर्मनीला जाणार होता. विमानतळावरत्याच्या पासपोर्टची तपासणी करीत असताना त्याबद्दल इमिग्रेशनच्या अधिका-यांना संशय आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात करण्यात आली. त्याने 2003 मध्ये एलटीटीईमध्ये प्रवेश करीत दोन वर्षांनंतर ही संघटना सोडली.
या कालावधीत एलटीटीईचा मुख्य तळ असलेल्या जाफनामध्येच त्याने शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षणही घेतले होते. त्याने तेथील सोनुगुंडा हिंदू महाविद्यालयामधून 2000 साली अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले असून पुढे त्याने शिक्षण अर्धवट सोडले. त्याने 2003 मध्ये कोकुविल टेक्निकल महाविद्यालयामधून तीन चाकी वाहनांच्या दुरुस्तीचे प्रशिक्षण आणि इलेक्ट्रीक वायरिंगचे प्रशिक्षण घेतले. याच कालावधीत त्याचा एलटीटीईशी संपर्क आला. साधारणपणे 2005 मध्ये त्याने संघटना सोडली. सुथान 2008 पासून डेन्मार्कच्या एका कंपनीसाठी काम करीत होता. ही कंपनी जाफना आणि परिसरात पेरण्यात आलेल्या भूसुरुंगांचा शोध घेण्याचे काम करते. काही काळ त्याने जाफनामध्येच रंगारी म्हणूनही काम केले आहे. श्रीलंकन मालक असलेल्या दुबईतील एका सुपरमार्केटमध्ये तो आॅगस्ट 2010 मध्ये नोकरीनिमित्त गेला होता. चार वर्ष नोकरी केलेला सुथान पुन्हा डिसेंबर 2014 मध्ये श्रीलंकेत परतला होता. त्याला दुबईमध्ये त्यावेळी भारतीय चलनानुसार 28 हजार तर श्रीलंकन चलनानुसार 60 हजार रुपये पगार मिळत होता.
श्रीलंकेतून पर्यटक व्हिसावर 2015 मध्ये भारतात आलेल्या सुथानने चेन्नईत सुमारे एक वर्ष वास्तव्य केले. त्या काळात छोटीमोठी कामे केली. चेन्नईमध्ये तो अष्टलक्ष्मी नगरमध्ये रहात होता. जर्मनीला एका मोठ्या पगाराची नोकरी देतो असे सांगणा-या एजंटच्या संपर्कात तो होता. त्याचा एक मित्र जर्मनीतच काम करीत होता. याच एजंटने त्याला पासपोर्ट आणि व्हीसा मिळवून दिला होता. जर्मनीच्या फ्रँकफर्टला नोकरीसाठी जात असल्याचे त्याने इमिग्रेशनच्या अधिका-यांना सांगितले आहे. त्याच्याकडील कागदपत्रे संशयास्पद असल्यामुळे ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्याच्याकडे गुप्तचर विभाग (आयबी), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), पुणे पोलिसांची विशेष शाखा यांनी कसून चौकशी केली. अशाच प्रकारचा आणखी एक गुन्हा यापुर्वी पुण्यात घडलेला असून ब-याचदा जाफनातील श्रीलंकन नागरिक परदेशात जाण्यासाठी भारताचा वापर करतात.