अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात अजित पवार अडकण्याची शक्यता
By admin | Published: August 31, 2015 11:22 AM2015-08-31T11:22:07+5:302015-08-31T11:24:12+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील असू शकतील, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
Next
अकलूज : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील भ्रष्टाचार हा आघाडी शासनाच्या काळात झाला असून, सीआयडीच्या प्राथमिक चौकशी अहवालात ३८५ कोटी रूपयांचा घोटाळा उघड झाला आहे. अंतिम अहवालापर्यंत घोटाळ्याची व्याप्ती वाढून, अध्यक्ष आ. रमेश कदमांबरोबरच आणखी नावे निष्पन्न होतील. त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील असू शकतील, असे समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त आयोजित महामेळाव्याच्या कार्यक्रमासाठी दिलीप कांबळे हे माळीनगर येथे आले असता ते बोलत होते. आम्ही सत्तेत आल्यानंतर हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे महामंडळात ५00 कोटी रूपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची घोषणा केली होती. त्याप्रकरणी सीआयडीची चौकशी चालू झाल्यानंतर ३८५ कोटी रूपयांचा घोटाळा महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांनी केल्याचे प्राथमिक अहवालात उघड झाल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. कदम हे तोंड लपवत फरार झाले. परंतु त्यांना सीआयडीने शेवटी अटक केली. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. त्यांच्याबरोबर अनेक जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पदाधिकार्यांना व्यवसायाच्या गाड्या खरेदीसाठी कोटेशन दाखवून अलिशान गाड्यांसह इतर महागड्या गाड्या देण्यात आल्या होत्या. आतापर्यंत ५0 गाड्या रिकव्हर झाल्या आहेत.
महामंडळाच्या १६ अधिकार्यांची व ८१ कर्मचार्यांची चौकशी सुरू आहे. तर तत्कालीन व्यवस्थापक ए. डी. बावणे हे फरार आहेत. त्यांच्या मागावर सीआयडी आहे. त्यांचा तपासही १५ दिवसांत लागेल. शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाबरोबर इतर महामंडळाची चौकशी केली आहे. परंतु इतर महामंडळात काही आढळले नाही. जिल्हा शिष्यवृत्ती घोटाळ्याचे आगार असून, २८ कोटींचा घोटाळा उघड झाला आहे. त्या घोटाळ्यात कर्मचारी सहभागी आहेत. घोटाळ्याची चौकशी सुरू असल्याने आकडा वाढू शकतो. या घोटाळ्यात ऑनलाईन शिष्यवृत्तीचे काम करणार्या कर्मचार्यांचाही हात असल्याने ठेका घेणार्यांना नोटिसा दिल्याचेही ते म्हणाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अनेक पक्षाचे लोक भाजपात आले होते, काही संपर्कात होते. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे प्रशांत परिचारक, संजय शिंदे व रश्मी बागल हे संपर्कात असल्याचे दिलीप कांबळे यांनी सांगितले.
विजयदादांचे भाजपावर प्रेम
>खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध आहेत. माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध होते. त्यामुळे विजयदादांचे भाजपावर प्रेम आहे, असेही समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.
मदत करणार्यांवरही कारवाई
> काहींनी तर आरडाओरडा होऊ नये यासाठी रस्त्यात गाड्या सोडून दिल्या. तर काहींनी जमा केल्या आहेत. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही नाव असू शकते. कारण तत्कालीन अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या काळात भ्रष्टाचार झाला आहे. तपासात घोटाळा उघड झाल्यानंतर रमेश कदम फरार झाले, त्यांना फरार करण्यात व मदत करणार्यांची शासन चौकशी करीत असून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.