जळगाव उपमहापौरांच्या अटकेची शक्यता
By admin | Published: June 21, 2016 02:45 AM2016-06-21T02:45:02+5:302016-06-21T02:45:02+5:30
मारहाण तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगावचे मनसे उपमहापौर ललित कोल्हे विरोधात जुहू पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला.
मुंबई : मारहाण तसेच मानसिक छळ केल्याप्रकरणी जळगावचे मनसे उपमहापौर ललित कोल्हे विरोधात जुहू पोलीस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात त्याला लवकरच अटक होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र आपल्या विरोधात रचलेले हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा कोल्हेनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
जुहू परिसरात तक्रारदार पत्नी भक्ती कोल्हे राहण्यास आहे. एका कार्यक्रमादरम्यान २००३ मध्ये भक्ती आणि ललित यांची भेट झाली होती. या भेटीनंतर त्यांची ओळख वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी २७ जानेवारी २००४ रोजी लग्न केले. भक्तीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या काही दिवसांनंतर कोल्हेचे आधीच लग्न झाल्याची माहिती मिळाली. हा वाद महिला दक्षता आयोगापर्यंत पोहोचला. आयोगाने दोघांमध्ये सामोपचार घडवला. मात्र दोघांमध्ये धुसफूस सुरुच होती. अशात आपण त्याची पाचवी पत्नी असल्याचे भक्तीचे म्हणणे आहे. भक्ती आणि ललित तीन वर्ष एकत्र राहिले, मात्र वाद विकोपाला गेल्यानंतर भक्ती मुंबईला परत आली. तर आई आजारी असल्यामुळे ललित जळगावातच राहिला. इकडे मुंबईत भक्तीने ललितविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर, ललितनेही घटस्फोटासाठी अर्ज केला.
याप्रकरणी जानेवारी महिन्यात जुहू पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरुन जुहू पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा कोल्हे विरोधात दाखल केला. त्यानंतर दोघांचेही जबाब नोंदविण्यात आले. मात्र स्थानिक पोलीस उपायुक्तांसोबत त्याचे साटेलोटे असल्याने त्याला अद्याप अटक झाली नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी जूहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील घोसाळकर यांच्याकडे विचारणा केली असता, सहा महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी न्यायालयाच्या नियमावलीनुसार चौकशी सुरु आहे. चौकशी अंतिम टप्प्यात असून चौकशीअंती जे सत्य उघड येईल, त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे घोसाळकर यांनी सांगितले. याप्रकरणात कोल्हेंना लवकरच अटक होण्याची शक्यता जुहू पोलिसांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)
पहिले लग्न
भक्तीच्या मते, ललितने २००१ मध्ये हर्षल नावाच्या महिलेशी पहिले लग्न केले. या दोघांना मुलगा आहे. तो सध्या १६ वर्षांचा आहे. हर्षलने मात्र २००८ मध्येच आत्महत्या केल्याचे भक्तीने सांगितले. हर्षलच्या मृत्यूनंतर ललितला जळगाव पोलिसांनी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून अटक केली होती, असे भक्तीने सांगितले. मात्र त्याची याप्रकरणात सुटका झाली होती.
१याबाबत ललिल कोल्हेने स्वत:वरील आरोप फेटाळून लावले. भक्तीचा वेश्या व्यवसायात समावेश असून, ती कोलकात्यातील रेड लाईट एरियात मुलींची विक्री केल्याप्रकरणी तिच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याचा आरोप ललितने केला आहे. याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे असल्याचे ललितचे म्हणणे आहे. तिचे मूळ नाव रुबी असून मी लग्नानंतर तिचे नाव भक्ती ठेवले. माझे तिच्यावर प्रेम होते म्हणून १२ वर्षे आम्ही संसार केला. निवडणुकांच्या तोंडावर राजकीय मंडळींना हाताशी धरुन आपल्याविरुद्ध षडयंत्र रचत असल्याचा आरोप ललित यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला आहे.
२याशिवाय भक्तीविरोधात मी अगोदरच फॅमिली कोर्टात खटला दाखल केला असून, कलम ४९८ अ अर्थात कौटुंबिक हिंसाचार सिद्ध करुन दाखवावे असे त्याचे म्हणणे आहे. त्यात भक्ती ही आपली दुसरी पत्नी आहे. त्यात पहिल्या पत्नीबाबत तिला पूर्ण कल्पना होती. इतर ज्या महिलांचा ती उल्लेख करत आहे. त्यांचे लग्न झाले असून त्या त्यांच्या संसार आनंदाने नांदत आहे. जर तिच्याकडे याबाबत काही पुरावे असतील तर तिने ते सिद्ध करुन दाखवावे असेही कोल्हे यांनी सांगितले.