"संतप्त मराठा आंदोलक मंत्र्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाड्या अडविण्याची शक्यता..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 12:18 PM2020-09-16T12:18:19+5:302020-09-16T12:35:23+5:30
राज्यभरात मंत्र्याच्या दौर्याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे
पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यभरातील मराठा तरुणतरुणींमधून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याचा परिणाम मराठा आंदोलकांकडून मंत्र्यांच्या भेटी व दौर्यांच्यावेळी काळे झेंडे दाखवून गाड्या अडविण्याची शक्यता असल्याचा इशारा राज्य गुप्तचर विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्यभरात मंत्र्याच्या दौर्याच्या काळात कडक बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, पुण्यात आंदोलन करणार्या मराठा नेत्यांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यभर मराठा क्रांती मोर्चा व संलग्न मराठा संघटनांकडून आंदोलने करण्यात येत आहे. मराठा आंदोलक कार्यकर्ते हे मंत्री महोद्यांच्या भेटी व दौर्याच्या वेळी काळे झेंडे दाखवून त्यांच्यासमोर निदर्शने करुन त्यांच्या कॅनव्हॉयला अडथळा करण्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली असल्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपायुक्त, सहायक आयुक्त व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी त्यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील गोपनीय यंत्रणा सतर्क करण्यात येऊन मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात यावे. तसेच मंत्र्यांच्या दौर्याच्या वेळी वरिष्ठ अधिकार्यांच्या देखरेखी खाली पुरेसा बंदोबस्त लावण्यात यावा. तसेच योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात येऊन कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश राज्यभरातील पोलिसांना देण्यात आले आहेत.
मराठा आंदोलकांना नोटीस
दरम्यान, मराठा समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा गुरुवारी १७ सप्टेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. मोर्चातील प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे.त्यात त्यांनी शहरात ३७ (३) प्रमाणे पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्तांच्या पूर्व परवानगीशिवाय बंदी घातली आहे. सभा किंवा मिरवणुक काढण्यास बंदी आहे़ कोणत्याही प्रकारची निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषणासारखे आंदोलनाचे कार्यक्रमाला बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला आपण व आपले कार्यकर्ते जबाबदार धरुन आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल,असे या नोटीसीत म्हटले आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या घराजवळील पोलीस ठाण्यांमधून नोटीस बजावण्यात आली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.