बुलडाण्यातील दोन नवनगरे रद्द होण्याची शक्यता
By admin | Published: March 21, 2017 03:20 AM2017-03-21T03:20:53+5:302017-03-21T03:22:28+5:30
मुंबई - नागपूर समृद्धी मार्गावर ४० किमी अंतरावर एक नवनगर स्थापन करण्यात येणार आहे.
ब्रह्मानंद जाधव / बुलडाणा
मुंबई - नागपूर समृद्धी मार्गावर ४० किमी अंतरावर एक नवनगर स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात तीन नवनगरांचा समावेश आहे; मात्र यासाठी आवश्यक ४०० हेक्टर जमिनीचे संमतीपत्र केवळ देऊळगावराजा येथील माळसगाव येथील शेतकऱ्यांकडून मिळाले आहे. अन्य दोन ठिकाणी अद्याप संमतीपत्र न मिळाल्याने दोन प्रस्तावित नवनगरे रद्द होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातून सुमारे ८७.२९० किमीवरून समृद्धी महामार्ग जात असून, या मार्गावरील मेहकर तालुक्यातील साब्रा, सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा व माळसावर गाव या ठिकाणी नवनगरांची निर्मिती करण्यात येणार होती; मात्र अद्याप मलकापूर पांग्रा व साब्रा या नवनगरांसाठी आवश्यक ४०० हेक्टरपर्यंत जमिनीचे संमतीपत्र प्राप्त झालेले नाही. त्यामुळे ती रद्द होऊ शकतात, असे जाणकारांचे मत आहे. किमान ४०० हेक्टरपर्यंत जमिनीचे संमतीपत्र मिळाल्यास नवनगर होऊ शकते, असे औरंगाबादचे अपर जिल्हाधिकारी तथा प्रशासक जगदीश मिनीयार यांनी सांगितले.