दिल्लीसाठी थेट गाडी मिळण्याची शक्यता!
By admin | Published: July 8, 2014 01:19 AM2014-07-08T01:19:30+5:302014-07-08T01:19:30+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मंगळवारी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा या अर्थसंकल्पात नागपूरच्या झोळीत काय टाकतात?
रेल्वे अर्थसंकल्प : वर्ल्ड क्लास स्टेशनचे स्वप्न साकार होणार
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार मंगळवारी आपला पहिला रेल्वे अर्थसंकल्प सादर करणार आहे. रेल्वेमंत्री सदानंद गौडा या अर्थसंकल्पात नागपूरच्या झोळीत काय टाकतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय भूपृष्ठ परिहवन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी हे नागपूरचे असल्याने रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरला लॉटरी लागण्याची अपेक्षा बळावली आहे. नागपूर ते दिल्ली आणि अमृतसरसाठी थेट रेल्वेगाडीची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होऊ शकते. इतकेच नव्हे तर प्रस्तावित वर्ल्ड क्लास स्टेशनमध्ये सामील नागपूर स्टेशनचे स्वरूपही पालटू शकते. यासाठी आवश्यक निधी वितरित होऊ शकते. इतवारी स्टेशनवर १३ तास उभी राहणाऱ्या टाटा पॅसेंजरच्या कोचचा उपयोग करून गोंदिया, कन्हान, कामठी, कळमना, इतवारी, नागपूर, बुटीबोरी, वर्धा आणि चंद्रपूरदरम्यान ‘लोकल मेमू ट्रेन’ चालविण्याची घोषणासुद्धा केली जाऊ शकते. वर्धा-यवतमाळ नांदेड मार्ग प्रकल्प, नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईन योजना, नागपूर- नागभीड प्रकल्प, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेज प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाऊ शकते. रेल्वे अर्थसंकल्पात नागपूरला झोन बनविण्याच्या मागणीवरही विचार केला जाऊ शकतो. पर्यटन रेल्वेगाडीसुद्धा चालविली जाऊ शकते. नागपूर-पुणे गरीबरथला दरदिवशी चालविण्याची घोषणा केली जाऊ शकते.
गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मेडिकल कॉलेज, मॅकेनाईज्ड लाँड्री प्रोजेक्ट, इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम, रेलनीर प्रोजेक्ट, स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाऊंज तयार करण्यासह अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले जाऊ शकते.
अर्धवट प्रकल्प रेल्वे मेडिकल कॉलेज
तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने वर्ष २००९-१० च्या रेल्वे अर्थसंकल्पात देशातील १९ ठिकाणी ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’ मॉडेलवर रेल्वे मेडिकल कॉलेज बनविण्याची घोषणा केली होती. यात नागपूरचाही समावेश होता. परंतु या दिशेने कुठलेही ठोस पाऊल अजूनपर्यंत उचलण्यात आलेले नाही.
मॅकेनाईज्ड लाँड्री युनिट
रेल्वेगाड्यांमधील ‘एअर कंडिशन कोच’मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सामान्य तक्रारींमध्ये प्रामुख्याने मळलेल्या चादरी आणि टॉवेलशीसंबंधित असतात. ही तक्रार दूर करण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०११-१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपूर, भोपाळ, चंदीगड आदी ठिकाणी मॅकेनाईज्ड लाँड्री युनिट लावण्याची घोषणा केली होती. नागपूरच्या अजनीमध्ये ही लाँड्री लागणार होती. परंतु अजूनपर्यंत कामाला सुरुवात झालेली नाही. (प्रतिनिधी)
रेलनीर बॉटलिंग प्लान्ट
तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ च्या रेल्वे अर्थसंकल्पात नागपुरातच रेलनीर बॉटलिंग प्लान्ट लावण्याची घोषणा केली होती. आयआरसीटीसीद्वारा बीओटी-पीपीपी तत्त्वावर हा प्लान्ट लावण्यात येणार होता. नागपूरच्या बोरखेडी(बुटीबोरी)मध्ये रेलनीर बॉटलिंग प्लान्ट लावण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने(आयआरसीटीसी)टेंडर जारी केले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र काहीही काम झाले नाही.
स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाऊंज
तत्कालीन रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी २०१३-१४ मध्ये नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाऊंज बनविण्याची घोषणा केली होती. मध्य रेल्वे नागपूर मंडळाचे तत्कालीन मंडळ व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी हा एक्झिक्युटिव्ह लाऊंज स्टेशनच्या पूर्व भागात बनविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना या लाऊंजमध्ये खानपानासह अत्याधुनिक सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. परंतु लाऊंजचा पत्ता नाही.
प्रशिक्षण संस्थानचाही पत्ता नाही
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक प्रौद्योगिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी नागपुरात बहुविभागीय प्रशिक्षण संस्था उघडण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु या संस्थेचा अजूनही पत्ता नाही. यासोबतच ग्रीन टॉयलेट प्रकल्पसुद्धा संथगतीने सुरू आहे. नागपुरात इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टम लागू करण्याच्या घोषणेला अनेक वर्षे लोटून गेली, परंतु अंमलबजावणी झाली नाही.
कळमना-नागपूर डबलिंग अडकले
वर्ष २००७-०८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात कळमना-नागपूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रोजेक्टला हिरवी झेंडी मिळाली होती. परंतु अजूनपर्यंत हा प्रकल्प पूर्णझालेला नाही.