पॅरिसवरील हल्ल्यांमुळे दोन्ही बाजूंकडील शत्रुत्वात वाढीची शक्यता

By admin | Published: November 16, 2015 12:18 AM2015-11-16T00:18:27+5:302015-11-16T00:18:27+5:30

फ्रान्समध्ये १३ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही बाजूंकडून शत्रुत्वात वाढ होईल, असे भारतीय सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे निरीक्षण आहे.

The possibility of growing aggression on both sides due to attacks on Paris | पॅरिसवरील हल्ल्यांमुळे दोन्ही बाजूंकडील शत्रुत्वात वाढीची शक्यता

पॅरिसवरील हल्ल्यांमुळे दोन्ही बाजूंकडील शत्रुत्वात वाढीची शक्यता

Next

डिप्पी वांकाणी,मुंबई
फ्रान्समध्ये १३ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही बाजूंकडून शत्रुत्वात वाढ होईल, असे भारतीय सुरक्षा यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याचे निरीक्षण आहे. नजीकच्या भविष्यात पाश्चिमात्य देशांमध्ये इस्लामिक स्टेट आॅफ इराक अँड सिरियाचे (इसिस) स्थानिक अत्यंत कडवे सहानुभूतीदार हल्ले करण्याची मोठी शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इसिसविरोधात सुरू केलेल्या हल्ल्यांच्या मोहिमेत युरोपियन देशांतून आणखी काही देश सहभागी होऊ शकतात. इसिसवर रशियाने स्वतंत्रपणे हल्ले केले असून भविष्यातील हल्लेही भयंकर स्वरूपाचे असतील, असेही या अधिकाऱ्याला वाटते. ‘‘इसिसवर हल्ले करण्यासाठी आता इटली, जर्मनी, नेदरलँडस्सारख्या देशांचे एकत्र काम करण्यासाठी फ्रान्स मन वळवू शकतो. तसे झाल्यास त्याच वेळी त्याची प्रतिक्रिया म्हणून पाश्चिमात्य देशांतील इसिसचे छुपे सहानुभूतीदार सक्रिय होऊन पॅरिससारखेच हल्ले घडवून आणू शकतील, असे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
माजी आयपीएस अधिकारी वप्पल्ला भालचंद्रन म्हणाले की, ‘पॅरिसमध्ये झाला त्या स्वरूपाचा हल्ला ब्रिटनमध्ये होऊ शकतो, असा इशारा ब्रिटनची गुप्तचर संघटना एमआय ५ च्या प्रमुखांनी अगदी उघडपणे दिला आहे. असा गुप्तचरांचा इशारा फ्रान्समध्येही दिला गेला असेल तर ते पोलिसांचे अपयश सिद्ध करतो. कारण ते दहशतवाद्यांना स्टेडियमवर जाऊ देण्यापासून रोखू शकले नाहीत.
भालचंद्रन म्हणाले की, ‘फ्रान्स सरकारच्या विरोधात उत्तर आफ्रिकन मुस्लिम स्थलांतरितांमध्ये खूप असंतोष आहे. भारतातून इंग्लंडमध्ये स्थलांतर केलेल्यांना तेथे नागरिकत्व व नागरी स्वातंत्र्य दिले जाते. फ्रान्सने मात्र ट्युनिशिया, मोरोक्को आदी देशांतून स्थलांतर केलेल्यांना आणि रस्ते सफाई करणारे व कारख्यान्यांमध्ये कामगार म्हणून काम करणाऱ्यांना तसे अधिकार दिलेले नाहीत. तेथील तरुणांमध्ये खूपच नाराजी व राग आहे.’ दहशतवादविरोधी पथकातील (एटीएस) आयपीएस अधिकारी म्हणाला की, ‘पॅरिसमधील हल्ला हा जिहादी जॉनला ठार मारल्याचा किंवा सिरियाचे; परंतु इसिसच्या ताब्यातील सिंजर गाव पुन्हा ताब्यात घेतल्याचा सूडही असू शकतो. मुंबईचे आणखी एक आयपीएस अधिकारी म्हणाले की, ‘‘या हल्ल्यानंतर युरोपियन युनियनच्या देशांच्या पोलिसांच्या कार्यपद्धतीत खूप मोठे बदल घडतील. फ्रान्समध्ये रस्त्यावर असलेल्या पोलिसांकडे शस्त्र नसते; परंतु अमेरिकेतील पोलीस सशस्त्र असतात. ही परिस्थिती बदलायला हवी.

Web Title: The possibility of growing aggression on both sides due to attacks on Paris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.