शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!

By दीपक भातुसे | Published: November 16, 2024 07:19 AM2024-11-16T07:19:09+5:302024-11-16T07:20:22+5:30

शरद पवार गट ८७ जागा लढवत असून, ८० मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारासमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.

possibility of confusion among the voters In 16 constituencies as the Trumpet symbol is given to independent candidates whose name is similar to the ncp sharad pawars candidates name | शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!

शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हातील साधर्म्यामुळे काही प्रमाणात मतांचा फटका बसू शकतो, अशी धाकधूक शरद पवार गटाच्या उमेदवारांमधून व्यक्त होत असतानाच उमेदवाराच्या नावाशी साधर्म असलेल्या १६ मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना ट्रम्पेट हे चिन्ह दिल्याने तिथे मतदारांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि ट्रम्पेट या चिन्हातील साधर्म्यामुळे शरद पवार गटाला सातारा लोकसभेची जागा गमवावी लागली, तर काही मतदारसंघांत पिपाणीवर अपक्षांनी हजारोच्या घरात मते घेतली होती. विधानसभेला याची पुनरावृत्ती होईल ही भीती लक्षात घेऊन पिपाणी हे चिन्ह गोठवावे, अशी मागणी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र, आयोगाने ही मागणी फेटाळून लावली, मात्र त्यावेळी या चिन्हाचा उल्लेख ईव्हीएमवर ट्रम्पेट असा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.  

शरद पवार गट ८७ जागा लढवत असून, ८० मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारासमोर ट्रम्पेट चिन्हावर अपक्ष उमेदवार रिंगणात आहे.

समान नाव आडनाव असलेले अपक्ष उमेदवार ट्रम्पेट चिन्ह घेऊन उतरले रिंगणात
कर्जत जामखेड - रोहित पवार विरुद्ध अपक्ष रोहित चंद्रकांत पवार, तासगाव - कवठेमहांकाळ - रोहित सुमन आर आर आबा पाटील विरुद्ध रोहित आर. पाटील, फलटण - दीपक चव्हाण विरुद्ध दीपक चव्हाण, मुरबाड - सुभाष गोटीराम पवार विरुद्ध सुभाष शांताराम पवार, आंबेगाव - देवदत्त जयवंतराव निकम विरुद्ध देवदत्त शिवाजीराव निकम, दौंड - रमेशआप्पा थोरात विरुद्ध रमेश थोरात, अहमदपूर - विनायकराव जाधव विरुद्ध विनायक जाधव, चिपळूण - प्रशांत बबन यादव विरुद्ध प्रशांत भगवान यादव, जामनेर - दिलीप खोडपे विरुद्ध दिलीप खामणकर, काटोल - सलील देशमुख विरुद्ध राहुल देशमुख, तुमसर - चरण वाघमारे विरुद्ध प्रेमलाल वाघमारे, अहेरी - भाग्यश्री अत्राम विरुद्ध भाग्यश्री लेखामी, सिन्नर - उदय सांगळे विरुद्ध दत्तात्रय सांगळे, दिंडोरी - सुनिता चारोस्कर विरुद्ध सुशिला चारोस्कर, शेवगाव - प्रतापराव ढाकणे विरुद्ध राजेंद्र ढाकणे, इस्लामपूर - जयंत पाटील विरुद्ध किरण पाटील

लोकसभेला चिन्हातील गोंधळामुळे झालेली चूक आमच्या मतदारांच्या लक्षात आलेली आहे, तसेच आम्हीही प्रचारात या संदर्भात मतदारांना जागरूक करत आहोत. शरद पवार गटाचे चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस असल्याचे आम्ही मतदारांच्या मनावर बिंबवत आहोत. त्याचबरोबर आता ट्रम्पेट हे नाव आल्यानेही मतदारांचा गोंधळ होणार नाही. 
- रोहित पवार, शरद पवार गट उमेदवार, कर्जत जामखेड.

 लोकसभेला कसा फटका बसला...
लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ३२ हजार ७७२ मतांनी पराभव झाला होता. या मतदारसंघात पिपाणी चिन्ह असलेल्या अपक्ष उमेदवाराला ३७ हजार ०६२ मते पडली होती.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा १ लाख १३ हजार १९९ मतांनी पराभव केला. इथे पिपाणी चिन्ह असलेले अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना तब्बल १ लाख ३ हजार ६३२ मते मिळाली होती.
भिवंडी मतदारसंघात २४,६२५, बारामती मतदारसंघात १४,९१७, शिरुर मतदारसंघात २८,३२४, अहमदनगरमध्ये ४४ हजार ५९७, बीडमध्ये ५४ हजार ८५० मते पिपाणी चिन्हाला मिळाली होती. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार अधिक सावध झाले आहेत.

Web Title: possibility of confusion among the voters In 16 constituencies as the Trumpet symbol is given to independent candidates whose name is similar to the ncp sharad pawars candidates name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.