...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 05:36 AM2019-11-12T05:36:59+5:302019-11-12T05:37:29+5:30

भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही

The possibility of opening the doors of discussion of the Mahayuti | ...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

...तर शिवसेना करणार भाजपाशी चर्चा; महायुतीच्या चर्चेची दारे उघडणार?

Next

मुंबई : भाजपशी झालेली सत्तास्थापनेची चर्चा निष्फळ ठरली, काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा दिला नाही अशा दुहेरी अपयशानंतर शिवसेना आता पुन्हा भाजपशी सत्तास्थापनेबाबत चर्चा करेल आणि भाजपही त्याला प्रतिसाद देईल, अशी शक्यता आहे. दोन्ही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यानंतर दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण झाला. प्रत्येकी अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनेने मागितले. लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या चर्चेत भाजपने तसा शब्द दिला होता, असे शिवसेनेचे म्हणणे आहे. तसा कोणताही शब्द दिलेला नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या.
भाजपला राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले पण भाजपने त्या बाबत असमर्थता व्यक्त केली. आता शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंबा देईल अशी शक्यता फारच कमी आहे. अशावेळी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेत चर्चा सुरू होऊ शकते. राज्यातील भाजपचे नेतृत्व शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करावी यासाठी आग्रही आहे आणि भाजपच्या कोअर कमिटीने तशी भावना राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कळविली होती.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भाजपचे दिल्लीतील नेतृत्व शिवसेनेशी सत्तासोबत करण्यास आता फारशी उत्सुक नाही. शिवसेनेच्या नेत्यांनी गेल्या काही दिवसात केलेली टोकाची टीका भाजपश्रेष्ठींच्या जिव्हारी लागली आहे. अशावेळी दोघांमध्ये चर्चा व्हायची तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना आपल्या पक्षश्रेष्ठींचे मन वळवावे लागणार आहे. केलेल्या टीकेबाबत शिवसेनेने दिलगिरी व्यक्त करावी, अशी अटदेखील घातली जाऊ शकते. ते शक्य झाले तर चर्चेची दारे पुन्हा उघडू शकतात. भाजप व शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे युतीची सत्ता स्थापन व्हावी असे खासगीत मोकळेपणाने बोलतात. दुसरीकडे मुख्यमंत्रि पदाबाबत शब्द दिलेला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला खटकलेले वाक्य मुख्यमंत्र्यांनी मागे घेतले आणि परत एकदा युतीसाठी साद घातली तर दोन्ही पक्ष जवळ येऊ शकतात.
मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून मुखभंग झालेल्या शिवसेनेची आता सत्तावाटपाबाबत भाजपशी चर्चा करताना ‘बार्गेनिंग पॉवर’ मात्र कमी झालेली असेल. अशावेळी अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाचा आग्रह शिवसेना किती लावून धरु शकेल, या बाबत साशंकता आहे.
राज्यात आगामी काही दिवसात राष्ट्रपती राजवट लागू झाली तर युतीच्या सत्ताचर्चेसाठी पुरेसा वेळ दोन्ही पक्षांना मिळेल. दोघांनी मिळून सत्ता स्थापन करावी असा दबाव दोन्ही पक्षांच्या आमदारांकडून पक्षनेतृत्वावर वाढेल.
>‘वर्षा’वर बैठकांचा जोर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे अन्य नेते आज दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठका करीत होते. पक्षाची कोअर कमिटी मुंबई, दिल्लीतील घडामोडींवर लक्ष ठेवून होती.
 

Web Title: The possibility of opening the doors of discussion of the Mahayuti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.