महामार्गावरील दारूबंदीच्या फेरविचाराची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 04:32 AM2018-01-17T04:32:02+5:302018-01-17T04:32:12+5:30
राष्ट्रीय महामार्गावरील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात आहे. त्यासाठी सर्व एक्साइज एसपींकडून माहिती मागविण्यात आली आहे.
राजेश निस्ताने
यवतमाळ : राष्ट्रीय महामार्गावरील पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावातील दारू दुकाने पुन्हा सुरू करण्याचा विचार शासन स्तरावर केला जात आहे. त्यासाठी सर्व एक्साइज एसपींकडून माहिती मागविण्यात आली आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील राज्यभरातील दारू दुकाने, परमीट रूम बंद करण्यात आले होते. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली. त्यावर ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाच हजारांपेक्षा अधिक आहे व जेथे पाणीपुरवठा, शौचालय, स्वच्छता, रस्ते अशा सर्व सोयीसुविधा आहेत, तेथील दारू दुकान सुरू करण्यास न्यायालयाने अनुकूलता दर्शविल्याची माहिती एक्साइजच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. राज्य शासनाने बंद झालेल्या दारू दुकानांपैकी पाच हजार लोकसंख्येच्या गावातील नेमकी दारू दुकाने किती याची माहिती मागितली आहे. ही दुकाने पुन्हा सुरू करता येऊ शकतात का, यादृष्टीने शासनाने चाचपणी चालविली आहे. तेथील सोयी-सुविधा तपासल्या जात आहेत. आठवडाभरात यासंबंधीचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.