भांडुपचे संभाव्य गँगवॉर गुन्हे शाखेने रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2015 03:36 AM2015-06-16T03:36:58+5:302015-06-16T03:36:58+5:30
अनिल पांडुरंग रांबाडे उर्फ गुज्जी याला गजाआड करून भांडुपमधील संभाव्य गँगवॉर गुन्हे शाखेने रोखले आहे. पोलीस अभिलेखावरील गँगस्टर
मुंबई : अनिल पांडुरंग रांबाडे उर्फ गुज्जी याला गजाआड करून भांडुपमधील संभाव्य गँगवॉर गुन्हे शाखेने रोखले आहे. पोलीस अभिलेखावरील गँगस्टर अनिलने ११ एप्रिलला वडाळ्याच्या जेरभाई वाडीया रोडवर प्रमोद कामतेकर नावाच्या तरुणावर गोळीबार केला होता. त्यानंतर रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांसोबत गुन्हे शाखा अनिलच्या मागावर होती. त्याला १२ जूनला भांडुपच्या ड्रीम्स मॉल परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट ३ने अटक केली. त्याच्याकडून सहा पिस्तुले आणि तब्बल १९ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली.
गुन्हे शाखेचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपीने (अनिल) या वडाळ्याच्या गोळीबारानंतर ठाण्याच्या घोडबंदर परिसरातही एका व्यक्तीच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या दोन्ही गुन्ह्यांत वापर झालेली शस्त्रे सापडली आहेत. शिवाय पूर्ववैमनस्यातून भांडुपमध्ये एक हत्याकांड घडविण्याच्या प्रयत्नात होता. वडाळ्यातील एका शिवशाही पुनर्विकास प्रकल्पातील वादातून अनिलने त्याच्या साथीदारांसह कामतेकरच्या हत्येचा प्रयत्न केला होता.
त्याच्या दोन साथीदारांना आधीच अटक झालेली आहे. पोलिसांना गुंगारा देत अनिल तब्बल दोन महिने ठाणे, कल्याण, शिर्डी, उंब्रज, सातारा, खेड-रत्नागिरी, जेजुरी या ठिकाणी फिरला. प्रत्येक ठिकाणी दोन ते तीन दिवसांवर तो राहत नसे. मात्र युनिट ३चे वरिष्ठ निरीक्षक अरविंद सावंत यांना तो १२ जूनला ड्रीम्स मॉल परिसरात येणार अशी माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण, निकुंबे, दत्ता मसवेकर, अंमलदार शरद शिंदे, तुषार जगताप, अविनाश वळवी या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिलने गँगस्टर अमित भोगलेच्या हत्येचा कट आखला होता. अमितने २०१३मध्ये गँगस्टर संतोष चव्हाण उर्फ काण्या संतोषची हत्या केली होती. अनिल हा याच काण्या संतोषचा नंबरकारी. हत्येनंतर संतोषच्या संघटित टोळीचा अनिल प्रमुख बनला. संतोषच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याने अमितच्या हत्येचा कट आखला होता. अनिल आणखी काही दिवस फरार झाला असता तर कदाचित त्याने अमितचा गेम केला असता. त्यातून भांडुपमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर भडकले असते.
अनिलविरोधात मोक्कासह एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. राजकीय वैमनस्यातून २००९मध्ये कुडाळचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. त्या गुन्ह्यातही तेथील पोलिसांनी भांडुपच्या संघटित गुन्हेगारी टोळीतल्या गुंडांना अटक केली होती. त्यात अनिलचाही सहभाग होता. या पार्श्वभूमीवर अनिल कोणत्या राजकीय नेत्याच्या संपर्कात आहे का, असा
प्रश्न ‘लोकमत’ने सहआयुक्त कुलकर्णी यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, तपासात जे समोर येईल त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करू.
तपास सुरू
अनिल १९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून सापडलेली शस्त्रे चाचणीसाठी बेलेस्टीक तज्ज्ञांकडून तपासून घेतली जातील. त्याने हा शस्त्रसाठा कोठून आणला? त्याने फरार असताना आणखी कोणते गुन्हे केले? याबाबत गुन्हे शाखा अनिलकडे कसून चौकशी करत आहे.