विदर्भात महाबीज संचालक पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 08:29 PM2017-12-24T20:29:58+5:302017-12-24T20:33:45+5:30
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (महाबीज) दोन संचालक पदाची निवडणूक जानेवारी महिन्यात होऊ घातली आहे. संचालक पदासाठी विदर्भ मतदारसंघातून विद्यमान संचालक खा. संजय धोत्रे यांनी तसेच उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. वल्लभराव देशमुख यांच्या विरोधातील इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने देशमुख यांची निश्चित मानली जात आहे. विदर्भ मतदारसंघातून खा. धोत्रे यांच्याविरोधात एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असून, निवडणुकीसाठी सभासदांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.
महाबीजच्या दोन संचालक पदाच्या निवडीसाठी दर तीन वर्षांनी निवडणूक प्रक्रिया पार पडते. त्यासाठी विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र अशा दोन मतदारसंघांचे गठन करण्यात आले आहे. निवडणुकीमध्ये महाबीजच्या कृषक भागधारकांना (सभासद) मतदारसंघानुसार मतदान करावे लागते. विदर्भ मतदारसंघातून महाबीजच्या संचालक पदावर खासदार संजय धोत्रे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. यावेळी त्यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला असून, खा. धोत्रे यांच्या विरोधात प्रशांत विश्वासराव गावंडे यांनी नामांकन अर्ज सादर केला आहे. उर्वरित महाराष्ट्र मतदारसंघातून बुलडाणा जिल्ह्यातील अमडापूर येथील वल्लभराव तेजराव देशमुख यांनी २00४ पासून विजयाची शृंखला कायम ठेवत यंदासुद्धा उमेदवारी अर्ज सादर केला. देशमुख यांच्या विरोधात आणखी तीन जणांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे देशमुख यांची संचालक पदावर बिनविरोध निवड झाली आहे. विदर्भ मतदारसंघातून संचालक पदासाठी दोन उमेदवारी अर्ज प्राप्त झाले असून, रीतसर निवड प्रक्रिया पार पडेल. १३ जानेवारी रोजी कृषक भागधारकांकडून मतपत्रिका स्वीकारल्या जाणार असल्याने २३ डिसेंबर रोजी त्यांना घरपोच मतपत्रिका व ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले आहे. मतपत्रिका स्वीकारल्यानंतर १९ जानेवारीपर्यंत त्यांची छाननी करून अंतिम यादी तयार केली जाणार आहे. २0 जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
राज्यात ८ हजार ३२१ सभासद
महाबीजमध्ये राज्यभरातून ८ हजार ३२१ कृषक भागधारकांची (सभासद) नोंद आहे. यामधून १ हजार ८00 भागधारकांचा मृत्यू झाला असून, विदर्भ मतदारसंघात ३ हजार ४६५ भागधारक तर उर्वरित महाराष्ट्रात ३ हजार ५६ भागधारकांचा समावेश असल्याची माहिती आहे.
२0१४ मध्ये असे झाले मतदान
२0१४ मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत एकूण १३ हजार ५३१ मतांपैकी खा. संजय धोत्रे यांना १0 हजार ४७५ मते मिळाली होती. प्रतिस्पर्धी उमेदवार प्रशांत गावंडे यांना २ हजार ९७८ तसेच पी.पी. भुयार यांना ५0 मते मिळाली होती. एकूण मतांपैकी २८ मते अवैध ठरली होती. यंदा सलग चौथ्यांदा खासदार धोत्रे रिंगणात आहेत.
सभासदांच्या शेअर्सची संख्या गृहीत
महाबीजमध्ये कृषक सभासदांनी खरेदी केलेल्या शेअर्सची संख्या मतांसाठी गृहीत धरल्या जाते. त्यामुळेच सभासदांची संख्या कमी असली, तरी मतांची आकडेवारी वाढलेली दिसून येते. राज्यभरातील सभासदांच्या शेअर्सची संख्या ५२ हजार ११२ असून, त्यामध्ये विदर्भ मतदारसंघाचा वाटा २२ हजार ४११ आहे.