परीक्षेमुळे मुंबईतील ६ मार्चचा मराठा क्रांती मोर्चा स्थगित
By Admin | Published: February 26, 2017 07:47 PM2017-02-26T19:47:54+5:302017-02-26T21:17:41+5:30
६ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय, रविवारी औरंगाबादेत पार पडलेल्या
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 6 - ६ मार्च रोजी मुंबईत आयोजित करण्यात आलेला मराठा क्रांती मोर्चा स्थगित करण्यात आल्याचा निर्णय, रविवारी औरंगाबादेत पार पडलेल्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला,अशी माहिती मोर्चाच्यावतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली. दहावी, आणि बारावी बोर्ड परीक्षेचे कारण मोर्चाच्या स्थगितीसाठी असल्याचे संयोजकांनी सांगितले.
मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, ६ मार्च रोजी मराठा क्रांती मोर्चाची तारीख निश्चित करण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्ह्यांतून या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर बैठकांही सुरू झाल्या होत्या. दरम्यान ६मार्च रोजी दहावी बोर्ड परीक्षा असल्याचे समोर आले. या परीक्षांमुळे दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही मोर्चात सहभागी होता येणार नसल्याने मोर्चा पुढे ढकलावा,अशी विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी एमजीएमच्या रूख्मिणी सभागृहात दिवसभर मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. राज्यातील २९ जिल्ह्याचे मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते. या बैठकीत मुंबईतील मोर्चाबाबत चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालकांचे म्हणने विचारात घेऊन ६ मार्च रोजीचा मुंबईतील मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याचे संयोजकांनी सांगितले. मुंबईतील मोर्चाची पुढील तारीख निश्चित करण्यासाठी लवकरच औरंगाबादेत राज्ययस्तरीय कोअर कमिटी बैठक होणार आहे.
बैठकीत निषेधाचे दोन ठराव
आजच्या बैठकीत सैन्य दलातील जवांनाच्या पत्नींचे चारित्र्यहणन करणारे विधान करणारे पंढरपूर येथील आमदार प्रशांत परिचारक यांच्या निषेधाचा आणि शांततेच्या मार्गाने चक्का जाम करणाऱ्या औरंगाबादेतील मराठा तरुणांवर मुद्दामहून लाठीहल्ला करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
मराठा क्रांती मोर्चाचे मुख्यालय औरंगाबादेत आणि अराजकीय सदस्यांची राज्यस्तरीय कोअर कमिटी
आतापर्यंत ५७ मूकमोर्चे काढण्यात आले. या मोर्चाने संपूर्ण जगाला शिस्त आणि संयमाचे दर्शन जगाला घडविले आहे. मुंबईतील मोर्चाही विनागालबोट व्हावा,यासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर आणि राज्यस्तरावर कोअर कमिट्या स्थापन केल्या जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येकी सात सदस्य राज्यस्तरीय कोअर कमिटीचे सदस्य असेल. आणि राज्यस्तरीय कमिटीवरील सर्व सदस्य अराजकीय असतील. आणि मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही निर्णय ही कोअर कमिटीच घेईल.कोअर कमिटीशिवाय मराठा क्रांती मोर्चाबद्दल कोणी कोणतीही भूमिका मांडल्यास ती त्या व्यक्तीची वैयक्तीक भूमिका असेल. शिवाय मराठा क्रांती मोर्चाने कोणासही प्रवक्ता म्हणून नियुक्त केलेले नाही.