महापौरपदासाठी भाजपात मोर्चेबांधणी सुरू
By admin | Published: March 1, 2017 01:17 AM2017-03-01T01:17:24+5:302017-03-01T01:17:24+5:30
महापालिकेच्या १३ व्या सभागृहातील ५६ व्या महापौरपदाचा मान भारतीय जनता पार्टीने बहुमतातून मिळवला आहे.
पुणे : महापालिकेच्या १३ व्या सभागृहातील ५६ व्या महापौरपदाचा मान भारतीय जनता पार्टीने बहुमतातून मिळवला आहे. या पदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची, याचा निर्णय पक्षाला १५ मार्चपूर्वी घ्यावा लागणार आहे. सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव असलेल्या या मानाच्या पदासाठी पक्षातील इच्छुक महिलांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून समर्थकांच्या माध्यमातून दावा पक्का करण्याचा प्रयत्न काहींनी सुरू केला आहे.
महापालिकेच्या सन १९५० पासूनच्या इतिहासात प्रथमच भाजपाला १६२ सदस्यांच्या सभागृहात ९८ संख्येचे बहुमत मिळाले आहे. निवडून आलेल्या ९८ सदस्यांमध्ये या पदासाठी पक्षाकडून ज्येष्ठता, अनुभव, शिक्षण, कोरी पाटी यासारख्या निकषांबरोबरच राजकारणातून येणारे अन्य काही निकषही लावले जाण्याची चिन्हे आहेत. पुणेकरांना पसंत पडेल, असाच महापौर देण्याची जबाबदारी पक्षाला पार पाडावी लागणार आहे.
पक्षात या पदासाठी पात्र महिलांची संख्या बरीच आहे. प्रामुख्याने मुक्ता टिळक, वर्षा तापकीर, मंजूषा नागपूरे, माधुरी सहस्रबद्धे, मानसी देशपांडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून ऐनवेळी भाजपात प्रवेश करून स्वत:बरोबरच प्रभागातील अन्य तीन जागाही निवडून आणणाऱ्या रेश्मा भोसले याही या पदासाठी इच्छुक आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींना १५ मार्चपूर्वी ही निवड करावी लागेल. मावळत्या सभागृहाची मुदत १४ मार्चपर्यंत आहे. त्यामुळे आता या पदासाठीच्या इच्छुकांनी आपला दावा पक्का करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांना थेट सांगण्याऐवजी समर्थकांच्या माध्यमातून नाव पुढे आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी सोशल मीडियाचाही वापर करण्यात येत आहे.
नव्या सभागृहाची पहिली सभा १५ मार्चला होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्याच सभेत महापौरपदाची निवडणूक होईल. त्यानंतर नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौरांची निवड होईल. त्यानंतर सभागृह ठरवेल त्यादिवशी विषय समितीच्या निवडीसाठी सर्वसाधारण सभा घेतली जाईल. (प्रतिनिधी)
>या पदाचा प्रमुख दावेदार असलेल्या मुक्ता टिळक यांची महापौरपदावर निवड झाली, असा मेसेज सोशल मीडियावरून दिवसभर फिरत होता. शहरात सर्वत्र याचीच चर्चा होती. अखेरीस स्वत: मुक्ता टिळक यांनीच टिष्ट्वटरवरून पक्षाने अशी कोणतीच घोषणा केली नसल्याचा खुलासा केला व समर्थकांनी
व्यक्त केलेल्या भावनांबद्दल त्यांचे आभार मानले.