मेळ्याची पदे आणि शंभर वर्षापुर्वीचा मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव
By अोंकार करंबेळकर | Published: August 28, 2017 04:15 PM2017-08-28T16:15:48+5:302017-08-28T16:33:07+5:30
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मेळे भरत असत. त्याला गणपतीचे मेळे म्हणण्यात येऊ लागले. या मेळ्यांमध्ये देशभक्तीपर पदांची रचना करुन म्हटली जात असे. प्रत्येक मंडळाची मेळ्याची पदे त्या मंडळांना ओळख मिळवून देत असे.
मुंबई, दि.28- दरवर्षी मागच्या वर्षीच्या देखाव्यापेक्षा मोठा आणि भव्य, महागडा देखावा करण्याची परंपरा आता मुंबईसह सगळ्या महाराष्ट्रात आहे. त्याचप्रमाणे एकेका आळीत किंवा गल्लीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त सार्वजनिक गणपती बसवले जात असल्यामुळे दोन मंडळांमध्येही स्पर्धा होते. मूर्तीची उंची, देखाव्याची उंची, त्यावरचा खर्च यामध्येही चढाओढ सुरु असते. मात्र शंभर वर्षांपुर्वी या उत्सवाचे स्वरुप याच्या अगदीच उलट होते. लोकांचे सामाजिक, राजकीय प्रबोधन हेच एकमेव उद्दिष्ट्य त्यामागे होते.
1893 साली लोकमान्यांनी घरगुती गणपतीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा व्हावा ही नवी कल्पना अंमलात आणली. मुंबईतही केशवजी नाईक चाळीमध्ये या शहरातील पहिला सार्वजनिक गणपती बसविण्यात आला. त्यानंतर हळूहळू इतर चाळींमध्येही गणपती बसविण्यात येऊ लागले. सार्वजनिक स्वरुप येण्याआधीही लोक आरत्या, बाणकोटी बाल्यांचे नाच, गाणी, बैठका यांची मौज पाहायला एकत्र होत असत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात मेळे भरत असत. त्याला गणपतीचे मेळे म्हणण्यात येऊ लागले. या मेळ्यांमध्ये देशभक्तीपर पदांची रचना करुन म्हटली जात असे. प्रत्येक मंडळाची मेळ्याची पदे त्या मंडळांना ओळख मिळवून देत असे. 1808-09 या काळात प्रसिद्ध झालेली ही पदे आज वाचायला मजेशिर वाटतात पण समाज प्रबोधनामध्ये या मेळ्यांच्या पदांनी उचललेला वाटा खरंच महत्त्वाचा असल्याचे दिसून येते. लोकांना त्यांच्या सध्यस्थितीवर विचार करायला लावणारी त्यांना सामाजिक परिस्थितीचे भान आणून देणारी गाणी तेव्हा गायली जात.
सत्यनारायण प्रासादिक सार्वजनिक गणपतीच्या मेळ्यांची पदे नावाने सिताराम यशवंत मालवणकर यांनी 1908 साली काही पदे छापून प्रकाशित केली होती. केवळ दोन आण्यांमध्ये मिळणाऱ्या या पुस्तिकेतील पदांचे शब्द विचार करायला लावतात. आपल्या देशी मालाला नाकारून विदेशी मालाला जवळ करणाऱ्या लोकांना उद्देशून मालवणकर लिहितात,
कसा काळ हा वंगाळ आला आल हाल कसा नशिबाला! आला धंद्याचे झाले मातेर! वाढे विदेशी धंदा फार !
ब्यूटिफूल फ्यॉन्सी असा मायावी माल निघाला ! आल हाल कस नशीबाला!
नको शेती भाती! गेल्या जुन्या रीती! आलि फजिती राव गरिबाची!
नका देवाचा करुं कंटाळा! आल हाल !!
(सर्व फोटो शेखर कृष्णन यांच्या संग्रहातून)
आपल्या एकेकाळच्या श्रीमंतीवर उड्या मारणाऱ्या आणि आता दारिद्र्य येऊनही डोळे न उघडणाऱ्या लोकांची या पदांमध्ये उपहासातून टीका केली आहे. लोकहो तुमच्यावर एवढी वाईट वेळ आली तरी तुम्ही पुर्वजाच्या श्रीमंतीच्या, त्यांच्या शौर्याच्या काय बाता मारता असा प्रश्नच मालवणकर यामध्ये लोकांना विचारतात.
नग जिव येऊ तुज कींव! देवा त्रास हा सोडीव कांचनभूमी माता असतां, कवडीही नच येई हाता!
दुर्देवाने पाठ पुरविली, तारी तारी शिवसुता! विसरुनी गेलो पराचि गादी, घोंगडी साधी न मिळे ती!
नांव बुडविले वडिलांचे आह्मी शंख निपजलो भूवरी!
धनीक होते पूर्वज आमुचे, चाकर आम्ही कमेटीचे! ताले पहा कसे नशीबाचे, आह्मी मास्तर झालो गटाराचे !!
जमीन जुमला समदा विकला बाळ्या आमुचा बि.ए. झाला!! चाकरी नाही भाकरी नाही टांचा घाशित घरी बसला !!
1909 साली सत्यनारायण प्रासादिक सार्वजनिक गणपतीच्या मेळ्यांची पदे लहू रामजी गोलतकर यांनी रचली होती. ही पुस्तिका देखिल दोन आण्यांमध्ये सर्वांना उपलब्ध होई. गोलतकरांनी यामध्ये झोपी गेलेल्या समाजातील तरुणावर अक्षरशः कोरडे ओढले आहेत. चांगली बुद्धी दे अशी गणपतीकडे प्रार्थना करा असे गोलतकर सर्वांना सांगतात. ते लिहितात,
जाहाले खरे नादान! सुजनहो कसे हरपले भान!
शेंडी कापुनि भांग पाडितां! कुरळ केस खुब छान!
मद्य प्राशुनी खोकड बनला! होतां प्रति सुदाम!
स्वधर्म टाकुनी परधर्माचे! चढविता निशाण!
(सर्व फोटो शेखर कृष्णन यांच्या संग्रहातून)
या पुस्तिकेच्या मुख्यपृष्ठाच्या मागच्या पानावर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे छायाचित्रही छापण्यात आले आहे. याच पदांमध्ये गोलतकर यांनी राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या आणि त्यावेळेस इंग्रज सरकारविरोधात लढणाऱ्या नेत्यांबद्दल लोकांना माहिती दिली आहे.
गजमुखा स्मरावे! सदा मनन करुनीया!!
मग गंगाधर सुत वंदुनिया! मनी धरा! प्रेम भाव खरा!!
लाल, बाल,पाल, खापर्डे यांसी स्मरोनिया!! गजमुखा!!
जन्म घेऊनि भुमीवरी हिंदुधर्म रक्षीयले! काम क्रोध जिंकियले त्याने मोठ्या युक्तीने!!
खुदीराम, दिनेशचंद्र यांनी देश रक्षणी! देह अर्पुनी! आर्य बांधवा विरही पाडुनी! आपण गेले कैलासा!!
अशा प्रकारे गोलतकरांनी क्रांतीकारकांचा आणि त्यांच्या त्यागाचा, बलिदानाचा खुबीने उल्लेख केला आहे.
या गाण्यांप्रमाणे बाळकृष्ण हरी चाफेकर, खुदीराम बोस, दामोदर हरी चाफेकर, महादेव विनायक रानडे, वासुदेव हरी चाफेकर या फाशी गेलेल्या पाच क्रांतीकारकांचा एकत्र फोटो 1910 साली कागदावर छापून वाटण्य़ात आला होता. त्यावर त्यांचा फोटो, नावे, फाशी गेल्याची तारिख आणि छपाईचे ठिकाण यापलिकडे कोणताही संदेश लिहिलेला नव्हता. त्यामुळे लोकांनी त्यातून घ्यायचा तो अर्थबोध घ्यावा आणि इंग्रजांच्या कचाट्यातून सूटका करुन घ्यावी असा त्यामागचा हेतू स्पष्ट होता.
(पाच फांशी गेलेले हिंदू तरुण या नावाने गणेशोत्सवात वाटलेले पत्रक, फोटो श्रेय- शेखर कृष्णन)
सणाच्या नावाखाली लोकांचे चाललेले हे प्रबोधन इंग्रज सरकारच्या लक्षात येत नव्हते असे नाही. 1910 साली मुंबई प्रांताच्या सेक्रेटरीने यापुढे अशा कार्यक्रमांवर लक्ष ठेवले जाईल अशी नोटीसच काढली होती. अर्थात गणपतीच्या माध्यमातून लोकांना एकत्र करणे, त्यांना स्वत्त्वाची जाणीव करुन देणे आणि इंग्रज सरकार करत असलेल्या अन्यायाविरोधात उभे राहण्याची ताकद हे मेळे देतच राहिले. आज शंभर वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळूनही सत्तर वर्षे झाली आहेत परंतु या उत्सवाने केलेले कार्य आजही सर्वांनी अभ्यासण्यासारखे आहे.
चंद्रदर्शन आणि दगड मारण्याची चतुर्थी...गणेशोत्सवाच्या मुंबईतील इतिहासाची काही पाने..