पोस्टाला झाली ६८० कोटींची कमाई
By admin | Published: October 10, 2015 05:44 AM2015-10-10T05:44:02+5:302015-10-10T05:44:02+5:30
माहिती तंत्रज्ञान युगात ई-कम्युनिकेशन वाढल्याने गतकाळातील पत्रोपत्रीच्या व्यवहारांवर मर्यादा आली असली तरी दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने पोस्ट खात्याला सावरलेदेखील आहे.
- अतुल कुलकर्णी, मुंबई
माहिती तंत्रज्ञान युगात ई-कम्युनिकेशन वाढल्याने गतकाळातील पत्रोपत्रीच्या व्यवहारांवर मर्यादा आली असली तरी दुसरीकडे याच तंत्रज्ञानाने पोस्ट खात्याला सावरलेदेखील आहे. अमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या ई कॉमर्स संस्था आणि इतर माध्यमातून पोस्टाला तब्बल ६८० कोटींची कमाई झाली आहे.
राज्य परिवहन खात्याने लायसन आणि आरसी बूक पोस्टानेच पाठवण्याचा निर्णय घेतल्याने पोस्ट आॅफिसला तब्बल २३ कोटींचा गल्ला मिळाला आहे. पोस्टकार्ड आणि व्यक्तिगत टपाल एकेकाळी रोज ४० ते ४५ लाखांच्या घरात येत असे. मोबाइल आणि कॉम्प्युटरच्या युगात हे प्रमाण एकदम कमी झाले; आणि व्यक्तिगत टपालांची संख्या दररोज २३ लाख एवढी कमी झाली. पोस्ट आॅफिसेस बंद पडतात की काय असे वाटत असताना पोस्टाने कात टाकली. राज्यात १२,८६० पोस्ट आॅफिसेस आहेत, त्यापैकी फक्त २२०० पोस्ट आॅफिसेस शहरी भागांत तर उर्वरित ग्रामीण भागांत आहेत.
आजपासून जागतिक टपाल सप्ताह सुरू झाला. आॅक्टोबर, नोव्हेंबर या दोन महिन्यांत पुणे जिल्ह्यातील ५५० पोस्ट आॅफिसेस हायटेक केली जाणार असून, पोस्टमनना इलेक्ट्रॉनिक हॅण्डल डिव्हाईस दिले जाणार आहे. ग्रामीण भागात विजेची टंचाई असते म्हणून या सगळ्या पोस्ट आॅफिसेसना सोलार पॅनल दिले जाणार आहेत. पोस्टात लॅपटॉपसारख्या गोष्टी येणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी होताच येत्या ५ वर्षात महाराष्ट्रातील १० हजार पोस्ट आॅफीसेस हायटेक केली जातील.
पोस्टाचे सहाय्यक पोस्टमास्तर जनरल एस.बी. व्यवहारे म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेचे राज्यात ३५ लाख खातेधारक असून यावर्षी आम्ही २८२७ कोटींचे वाटप त्याद्वारे केले आहे. त्याशिवाय राज्यातील पोस्टात ३ कोटी १५ लाख खातेधारक असून त्यांची ७०७ कोटींची गुंतवणूक आमच्याकडे सुरक्षित आहे. नुकत्याच सुरु झालेल्या सुकन्या समृध्दीची योजनेचे आत्ताच ४ लाख ८४ हजार खातेधारक झाले असून त्यांनी २०५ कोटींची गुंतवणूक पोस्टात केली आहे. यावर्षी २० लाख खाते उघडण्याचा संकल्प पोस्टाने सोडलेला आहे.
‘कुठेही पैसे भरा, आणि कोठूनही काढा’ या योजनेअंतर्गत कोअर बँकींग सोल्यूशन पध्दती पोस्टाने ६२२ पोस्ट आॅफीसमध्ये सुरु केली. येत्या ३१ आॅक्टोबर अखेरीस ३२२ पोस्ट आॅफीसांची त्यात भर पडणार आहे. आज पोस्टातर्फे दररोज हाताळल्या जाणाऱ्या टपालामध्ये कार्पोरेट सेक्टरचे १० लाख, स्पीडपोस्टचे ४.५ लाख, रजीस्टर्डच्या २ लाख टपालांचा समावेश आहे. रेल्वे रिर्झवेशनची सोय पोस्टाने राज्यातल्या फक्त ३७ पोस्टात करुन दिली होती तर त्यातून पोस्टाला १.२५ कोटी रुपये मिळाले.
बिझनेस देणारे...
आरटीओ२३ कोटी
बडोदा बँक१० कोटी
अॅक्सिस बँक ७.७५ कोटी
एमएसईबी७.५ कोटी
ई कॉमर्स६.९ कोटी
एसबीआय५ कोटी