पुण्यात पोस्टाने आलेला पदार्थ ‘स्फोटक’च!
By admin | Published: July 14, 2015 12:39 AM2015-07-14T00:39:16+5:302015-07-14T00:39:16+5:30
संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये टपालाद्वारे प्लास्टिक पिशवीमधून पाठवण्यात आलेली पावडर ‘स्फोटक’च असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल
पुणे : संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयामध्ये टपालाद्वारे प्लास्टिक पिशवीमधून पाठवण्यात आलेली पावडर ‘स्फोटक’च असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतचा अंतिम अहवाल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून येणे बाकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विश्रामबाग पोलिसांनी स. प. महाविद्यालय पोस्ट आॅफिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी दिवसभरात दहा ते बारा जणांची पोलिसांनी चौकशी केली.
कन्या शाळेजवळील जिजाई प्रकाशनाच्या कार्यालयामध्ये शनिवारी टपालाद्वारे एक डिटोनेटर आणि एक स्फोटक पदार्थ पाठवण्यात आला होता. संघटनेचे राज्य संघटक अजय भोसले यांच्या नावाने आलेले हे पार्सल रविवारी उघडल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पार्सलवर स. प. महाविद्यालय पोस्ट आॅफिसचा शिक्का असल्याने आरोपी पुण्यातील असल्याचा संशय व्यक्त होत आहे. खोडसाळपणामुळे केलेले हे कृत्य आहे की खरोखरीच दहशत पसरवण्यासाठी पार्सल पाठवण्यात आले आहे, याचाही तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील पिंजण यांनी दिली.
संबंधित पदार्थांची बॉम्बशोधक व नाशक तसेच श्वान पथकाने तपासणी केली होती. तेव्हा हा पदार्थ स्फोटकच असल्याचे निष्पन्न झाले होते. ही पावडर आणि डिटोनेटर न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला आहे. त्याचा अहवाल पुढील दोन दिवसांत येणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)