स्मार्ट बायका कुठे जातात, पिंपरी चिंचवडसमोर एकच प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:17 PM2018-10-11T16:17:43+5:302018-10-11T17:08:04+5:30
स्मार्ट बायका कुठे जातात अशी आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले.
पिंपरी : एका प्रेमवीराने प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरात फलेक्सबाजी केल्याचा विषय चर्चेत आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच, स्मार्ट बायका कुठे जातात अशा आशयाची पोस्टर्स सानेचौक चिखली आणि खंडोबामाळ आकुर्डी येथे झळकल्याचे पहावयास मिळाले. महिलांबद्दल अशा पद्धतीने केल्या जाणाऱ्या जाहीर कृतींमुळे शहर वेगळ्या अर्थाने चर्चेत आले असून सलग दुसऱ्यांदा अशी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
खंडोबा माळ चौक, आकुर्डी, तसेच साने चौक चिखली या परिसरात वर्दळीच्या ठिकाणी ‘स्मार्ट बायका जातात कुठे’ अशा आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत. दर्शनी ठिकाणी हे फ्लेक्स असल्याने सहज नजरेत येत आहेत. स्मार्ट बायका जातात कुठे हे मोठ्या आकारातील अक्षरात लिहिलेले आहे. त्या मजकुराखाली या जागेवर लक्ष ठेवा, १५ आॅक्टोबर असेही लिहिले आहे. कापड विक्री दुकानदार अथवा ब्युटी पार्लर दुकानाची जाहिरात असावी, जाहिरात आकर्षक ठरावी, या उद्देशाने जरा हटके शब्दांकन करण्याची शक्कल लढविल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. हे फ्लेक्स कोणी लावले ? महापालिकेच्या आकाशचिन्ह परवना विभागाकडून परवानगी घेतली आहे का? याची माहिती घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. नवरात्रोत्सव अर्थात दुर्गा उत्सव सुरू असताना, महिलांच्यादृष्टीने अवमानकारक ठरेल असे फलक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्याला बाधा पोहोचू शकते, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
प्रेयसीची माफी मागण्यासाठी ‘शिवडे आय एम सॉरी’ अशा आशयाचे तब्बल तीनशे हे फ्लेक्स पिंपळे सौदागरच्या रस्त्यावर, चौकाचौकात लावल्याचा प्रकार मागील महिन्यात उघडकीस आला होता. प्रेयसीची माफी मागण्यासाठी भर चौकांमध्ये फ्लेक्स लावल्याबद्दल नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी नोंदवुन संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र फ्लेक्स लावल्याची माहिती शहरभर पसरताच तातडीने प्रेमवीराने प्रेयसीची माफी मागण्यासाठी लावलेले फ्लेक्स काढून घेतले होते. त्यामुळे अनधिकृत हे फ्लेक्सवर कारवाईचा प्रश्न उद्भवला नाही. शिवाय मुलीच्या नावाचा उल्लेख नसल्याने कोणाही तरूणीची तक्रार नसल्याने प्रेमवीरावर काहीच कारवाई झाली नाही. हा मुद्दा शहरात बहुचर्चित ठरला होता.