पदव्युत्तर वैद्यकीय, दंत अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना राखीव जागा
By admin | Published: April 30, 2017 03:12 AM2017-04-30T03:12:54+5:302017-04-30T03:12:54+5:30
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाला सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमाला सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांना राखीव जागा ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
देशपातळीवर प्रवेश परीक्षा सुरू झाल्यानंतरही काही राज्ये स्थानिक पातळीवरील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्राधान्य देतात. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना अन्य राज्यांत प्रवेश मिळवणे अवघड होते. यामुळे राज्यातून एमबीबीएस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना आणि राज्याचे अधिवासी उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील डॉक्टरांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.
अभिमत विद्यापीठात आणि खासगी विनाअनुदानित महाविद्यालयातील पदव्युत्तर वैद्यकीय आणि दंत अभ्यासक्रमांसाठी राज्य कोट्यातील ५० टक्के जागांमधील प्रवेश देताना राज्यातून एमबीबीएस उत्तीर्ण झालेल्या आणि महाराष्ट्र अधिवासी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तर, संस्था पातळीवरील ३५ टक्के जागांपैकी ५० टक्के (एकूण जागांच्या १७.५ टक्के) जागा उमेदवारांसाठी राखीव आहेत. १५ टक्के जागा या अनिवासी भारतीय कोट्यासाठी असून त्या अखिल भारतीय गुणवत्तेनुसार भरण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)