महसूल विभागात 'पोस्टींग' युध्द सुरूच; ठाकरे सरकारकडून अनेक प्रांत, तहसीलदारांच्या मुदतपूर्व बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2020 02:03 PM2020-10-05T14:03:25+5:302020-10-05T14:11:10+5:30
अनेक प्रांत, तहसीलदारांच्या मुदतपूर्व बदल्या
सुषमा नेहरकर-शिंदे -
पुणे : राज्यातील महाआघाडी सरकारने मोठ्या प्रमाणात महसूल विभागात प्रांत अधिकारी, तहसिलदार यांच्या बदल्या करत ग्रामीण भागात खांदेपालट करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या बदल्या होताना नेहमी प्रमाणेच " की पोस्टींग " मिळवण्यासाठी, आपल्याला हवे ते पद, जिल्हा, तालुका मिळविण्यासाठी मोठे 'पोस्टींग' युद्ध झाले आहे. यात अनेकांनी घोडेबाजार करत मुदतपूर्वच व आपल्याच सहकाऱ्यांना 'खो' देत पोस्टींग पदरात पाडून घेतले आहे. शासनाने या बदल्या करताना अनेकांना एक-दोन वर्षांतच त्या पदावरून उचलून दुसरीकडे टाकले आहे. यामुळेच मुदतपूर्व बदली केलेले काही अधिकारी शासनाच्या विरोधात " मॅट" न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य शासनाने दोन दिवसांपूर्वीच पुणे विभागात सुमारे १४ उपजिल्हाधिकारी आणि २२ तहसिलदार यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी बहुतेक सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या केल्या. यात विभागीय आयुक्त पदापासून जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि अन्य आयएएस अधिका-यांचा समावेश होता. यात पवार यांनी बहुतेक सर्व महत्त्वाच्या जागांवर आपल्या स्टाईल ने काम करणारे अधिकारी बसवले. सत्तांतरानंतर आयएएस अधिका-यांच्या बदल्या करणे ही प्रत्येक राज्यातील नियमित प्रॅक्टिस समजली जाते. परंतु या महाआघाडी सरकारने थेड तहसिलदार, उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पदा पर्यंत खाली घसरले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यांच्यासह चिटणीस विवेक जाधव, तहसिलदार निवास ढाणे याच्या सह अन्य अनेक अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या आहेत. पुण्यात त्याही मुख्यालयात पोस्टींग मिळविताना आपल्याच सहकार्यांना खो देण्यासाठी काही अधिका-यांनी राज्यकर्त्यांना हाताशी धरून मोठे आर्थिक व्यवहार करत पद मिळवली आहेत. शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात काही अधिकारी मॅट न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु अनेकांनी लोकमतला सांगितले, आमच्यावर अन्याय झाला पण शासनाशी पंगा घेऊन काय करायचे.