'चला हवा येऊ द्या'मधील पोस्टमन काका आता दहावीच्या पुस्तकात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2018 09:09 PM2018-04-09T21:09:22+5:302018-04-09T21:09:22+5:30
शाळेत पुस्तकावर आपलं नाव लिहितांना कधी विचारसुद्धा केला नव्हता एक दिवस पुस्तकवालेच आपलं नाव छापतील.
मुंबई - चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या भेटीला येणारे पोस्टमन काका हे आता अवघ्या महाराष्ट्राच्या चांगल्याच ओळखीचे आहेत. आपल्या पत्रांच्या माध्यमातून ते विविध प्रकारच्या सामाजिक विषयांना हात घालत त्यावर चपखल भाष्य करण्याचे काम करतात. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. अर्थात या शब्दांना धार असते ती प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांची.
अरविंद जगताप यांचे पत्र दहावीच्या पाठ्यपुस्तकात छापण्यात आलं आहे. दहावीचे विद्यर्थी आता त्यांच्या पत्रांचा अभ्यास करणार आहेत. याची माहिती स्वत अरविंद जगताप यांनी फेसबुक पोस्टच्यामाध्यमांतून दिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चला हवा येऊ द्या च्या टीमचे आभार मानले आहेत.
अरविंद जगताप यांची फेसबुक पोस्ट
शाळेत पुस्तकावर आपलं नाव लिहितांना कधी विचारसुद्धा केला नव्हता एक दिवस पुस्तकवालेच आपलं नाव छापतील. पण चला हवा येऊ द्या मधल्या पत्रांनी इथवर आणलं. यावर्षी दहावीला धडा आहे मराठीला. बालभारतीचे आभार.