तीन दशकापासून पोस्टमन भरतीला मुहूर्तच नाही!
By admin | Published: July 8, 2014 09:55 PM2014-07-08T21:55:59+5:302014-07-08T21:55:59+5:30
सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती.
वाशिम: सन १९८२ मध्ये पोस्टमनची शेवटची भरती झाली होती. तेव्हापासून भरती बंद करण्यात आली. उलट पाचव्या वेतन आयोगात पोस्टमनसह १0 टक्के कर्मचार्यांची कपात करण्यात आली
जागतिकीकरण, बाजारीकरण तथा शहरीकरणाच्या स्पर्धेत अस्तित्व टिकविण्यासाठी पोस्ट कार्यालयांचे आधुनिकीकरण करण्याचा डांगोरा पिटणार्या टपाल विभागाला तब्बल ३0 वर्षापासून पोस्टमनची भरती करण्याला मुहूर्त गवसला नाही. परिणामी टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमनची संख्या कमालीची रोडावली. सन २0११ मध्ये राज्यभरात २७६७१ ्रपोस्टमन कार्यरत होते. मात्र सन २0१३- २0१४ मध्ये ही संख्या २0 हजार ५0४ पर्यत घटली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून दळणवळणाच्या क्षेत्रात पोस्टाची मक्तेदारी राहिली आहे. काही वर्षापर्यंत पोस्टाच्या सेवेशिवाय संपर्काचे साधन नव्हते. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा निरोप, खुशाली, नोकरीविषयक पत्रे तसेच अन्य महत्वपूर्ण कागदपत्रासाठी पोस्टमनचीच वाट पाहावी लागत होती. परंतु गेल्या सात-आठ वर्षात परिस्थिती बदलली आहे. स्पर्धात्मक युगामध्ये खुली अर्थव्यवस्था, जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे पोस्टाशिवाय अन्य माध्यमातूनही जनतेला विविध प्रकारच्या सेवासुविधा मिळू लागल्या आहेत. याचा विपरित परिणाम पोस्टावर होऊ लागला आहे. पोस्टाची होणारी अधोगती थांबविण्यासाठी टपाल विभागाने प्रोजेक्ट अँरो सारख्या विविध महत्वपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्यातून पोस्ट कार्यालयांचे आधुनिकरण करण्यात आले आहे.परंतु आधुनिकरण करीत असताना टपाल विभागाचा कणा असलेल्या पोस्टमॅनकडे या विभागाचे सपशेल दुर्लक्षच झाले आहे. सन २0११- १२ मध्ये राज्यभरात तब्बल २७ हजार ६७२ पोस्टमन होते. यामध्ये २0 हजार ३८५ ग्रामिण भागात तर ७२८६ शहरी भागात कार्यरत होते. सन २0१२- २0१३ मध्ये पोस्टमॅनची ही संख्या घटून २७ हजार २५४ झाली. यामध्ये शहरी भागातील ६२५५ तर ग्रामिण भागातील २0 हजार ९९९ पोस्टमॅनचा समावेश होता. सन २0१३ - २0१४ मध्ये ही संख्या पुन्हा घटली. आजमितीला शहरी भागात ५९६0 तर ग्रामिण भागात २0 हजार ५0४ पोस्टमॅन कार्यरत आहेत.