मुंबईतील टोलमाफी लांबणीवर
By Admin | Published: July 29, 2015 02:17 AM2015-07-29T02:17:09+5:302015-07-29T02:17:09+5:30
मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे.
मुंबई : मुंबईतील प्रवेशाकरिता पाच टोलनाक्यांवर आकारण्यात येणारा टोल १ आॅगस्टपासून बंद करण्याच्या राज्यातील सरकारच्या घोषणेची अंमलबजावणी तीन महिने पुढे गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात अपयश आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी मुंबईतील प्रवेशद्वारांवरील टोल रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री पाटील यांना सोमवारी रात्री सादरीकरण केले. त्यानंतर
१ आॅगस्टची डेडलाइन आणखी तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला.
पाटील म्हणाले की, मुंबईच्या प्रवेशद्वारावरील या टोलनाक्यांवर ७० टक्के रक्कम छोट्या वाहनांकडून गोळा होते. त्यामुळे अन्य टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना दिली तशी टोलमाफी येथे द्यायची झाली तर मोठ्या वाहनांवरील टोल आकारणीचा कालावधी आणखी किती काळ वाढवावा लागेल त्याबाबतचा अचूक अंदाज काढण्यात अधिकाऱ्यांना अद्याप यश आलेले नाही. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील.
कोल्हापूरमधील नऊ टोलनाक्यांवरील टोलमाफीबाबत चर्चा सुरू आहे. टोलविरोधी कृती समितीने नाव सुचवलेल्या आर्किटेक्ट असोसिएशनकडून आयआरबीला भरपाई द्यायच्या भूखंडाचे पुनर्मूल्यांकन करून घेण्यात आले. त्यानुसार ही रक्कम २६९ कोटी रुपये झाली. आता ही रक्कम टोल कंत्राटदार कंपनी आयआरबीला मान्य होणे आवश्यक आहे. त्यांना ही रक्कम मान्य नाही. मात्र हा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावरील
१८ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. (विशेष प्रतिनिधी)
टोल कंपन्यांना भरपाई द्यावी लागेल
सध्या या टोल आकारणीचा कालावधी २०२९पर्यंत आहे. मुंबईतील पाचही टोल नाके एकरकमी पैसे देऊन बंद करायचे झाले तर २ हजार कोटी रुपये कंत्राटदाराला द्यावे लागतील. राज्य सरकारने दरमहा ४०० कोटी रुपये देऊन ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी दिली. मुंबईतील केवळ पाच टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची तर दरमहा सुमारे २०० कोटी रुपये द्यावे लागतील.
मुंबई-गोवा महामार्गावरील पात्रादेवी ते झाराप या टप्प्याचा खर्च ६ हजार कोटी रुपये आहे. हा खर्च केंद्र सरकार करील, असा केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा मानस असल्याचे पाटील यांनी सांगितले.