'स्थगिती सरकारप्रमुखांनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांनाच स्थगिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 12:43 AM2020-02-23T00:43:47+5:302020-02-23T06:48:24+5:30
भाजपची शिवसेनेवर टीका; राज्यव्यापी आंदोलनात स्थानिक प्रश्नही घेणार
ठाणे : सायन्स पार्क आणि अर्बन फॉरेस्ट या दोन प्रकल्पांना गुरुवारी झालेल्या महासभेत स्थगिती दिल्यानंतर भाजपला सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे. दस्तुरखुद्द स्थगिती सरकारचे प्रमुख अर्थात मुख्यमंत्र्यांनीच भूमिपूजन केलेल्या प्रकल्पांना शिवसेनेकडून स्थगिती कशी काय दिली जाते, असा प्रश्न ठाणे शहर भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी शनिवारी केला.
दोन्ही प्रकल्पांना स्थानिक नगरसेवक संजय भोईर यांचा सुरु वातीपासूनच विरोध होता. तरीदेखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. या ठिकाणी खेळाचे मैदान विकसित करण्याचा त्यांचा प्रस्ताव होता. गुरु वारच्या महासभेतदेखील त्यांनी या प्रकल्पाला विरोध केल्यानंतर महापौर नरेश म्हस्के यांनी या दोन्ही प्रकल्पांना स्थगिती दिली. परस्परविरोधी निर्णयामुळे शिवसेनेच्या भूमिकेवरच संशय निर्माण झाल्याचे डावखरे म्हणाले.
गावठाण, कोळीवाड्यांच्या समस्या मांडणार
राज्यातील विविध प्रश्नांवर २५ फेब्रुवारीला भाजपा राज्यव्यापी आंदोलन छेडणार असले, तरी यामध्ये ठाणे महापालिकेतील स्थानिक प्रश्नांवरदेखील निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती डावखरे यांनी दिली. क्लस्टरमध्ये गावठाण, कोळीवाडे वगळणे, दिवा डम्पिंग प्रश्न, पाणीप्रश्न अशा अनेक मुद्यांवर निदर्शने करणार आहे.
राज्याच्या प्रश्नांनावर जसे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे ठाण्याच्या प्रश्नांवरदेखील ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जेणेकरून येथील समस्यांवर उपाययोजना करता येणार आहेत.
करमाफीची घोषणादेखील फसवी : शिवसेनेने पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वी ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी देण्याची घोषणा केली होती. मुंबई महापालिकेत या घोषणेची अंमलबजावणी झाली असली, तरी ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेने मात्र ठाणेकरांची फसवणूक केली असल्याची टीकाही त्यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यत्वेकरून क्लस्टरच्या भूमिपूजनासाठी आले होते. या मुख्य कार्यक्र मात हे दोन कार्यक्रम प्रशासनाने घुसवले. या प्रकल्पाला संजय भोईर आणि इतर स्थानिक नगरसेवकांचा विरोध होता. त्यासंदर्भात सभागृहात भोईर आणि नजीब मुल्ला यांनी गंभीर आरोप केले. एका विकासकासाठी ते केले असून त्याला टीडीआरदेखील दिल्याचा आरोप त्यांनी केल्याने प्रशासनाकडून यासंदर्भात मी स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, ते अद्याप दिलेले नाही. त्यामुळे जोपर्यंत ते येत नाही, तोपर्यंत या प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, असे आदेश मी सभागृहात दिले आहेत. ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना करमाफी दिली जाईल.
- नरेश म्हस्के, महापौर, ठामपा