पोतराजांना हवी वृध्द कलाकारांसारखी पेन्शन!

By admin | Published: July 15, 2017 03:16 PM2017-07-15T15:16:07+5:302017-07-15T15:16:07+5:30

आम्ही आमची मुले देवाला सोडतो...घर चालवताना मात्र तारांबळ उडते.

Potaraj wants a pension like old artists! | पोतराजांना हवी वृध्द कलाकारांसारखी पेन्शन!

पोतराजांना हवी वृध्द कलाकारांसारखी पेन्शन!

Next

ऑनलाइन लोकमत/ रवींद्र देशमुख

सोलापूर, दि. 15-  लहानपणीच मला आई - वडिलांनी देवाला सोडले अन् पोतराज झालो. आमच्या घरात ही प्रथा वंशपरंपरागत आहे. माझ्यासारख्या अनेक पोतराजांचंही असंच असतं. आम्ही आमची मुले देवाला सोडतो...घर चालवताना मात्र तारांबळ उडते. भागतच नाही. काही काळानंतर पोतराजीही बंद पडले; तेव्हा मात्र संसार चालवताना यातना भोगाव्या लागतात. ही स्थिती सांगितली 52 वर्षीय पोतराज संभाजी कोंडीबा राजगुरू यांनी. राजगुरू आणि अन्य पोतराजांसमवेत त्यांचा हलगीवाला दादाराव बनसोडेही बोलत होता. त्याने राज्य सरकारकडे पोतराजांना वृध्द कलाकारासारखी पेन्शन देण्याची मागणी केली.
 
आषाढ महिन्यात काही समाजामध्ये पोतराजांना देवाच्या पूजेच्या निमित्ताने आमंत्रित केले जाते. त्यांना व्यवस्थित दक्षिणाही दिली जाते. वर्षभर पुरेल इतका पैसा मिळत नाही पण काही रक्कम हातात येते अन् त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागते. सोलापुरातील वीरशैव गवळी समाजाची कुलदेवता लक्ष्मीदेवीची सध्या यात्रा सुरू आहे. देवीसाठी घागरी काढण्याचा एक विधी गवळी समाजात केला जातो. त्यासाठी घरापासून मंदिरापर्यंत पोतराजासह मिरवणूक काढली जाते. या निमित्ताने सिव्हील हॉस्पीटलच्या आवारातील लक्ष्मीदेवीच्या मंदिराजवळ काही पोतराज भेटले. बऱ्याच जणांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची इच्छा दिसली नाही. संभाजी राजगुरू, सुरेश राजगुरू हे पोतराज आणि त्यांचा हलगीवाला दादाराव मात्र ‘लोकमत’शी बोलू लागले.
 
पोतराज राजगुरू म्हणाले, आता पोतराजाची संख्या कमी झाली आहे. मागासवर्गीय समाजातील काही जातींमध्येच अधिकाधिक पोतराज दिसून येतात, पण सध्या सोलापुरात केवळ २१ पोतराज उरले आहेत. आषाढ महिन्यात आमची आर्थिक चलती असते. लोक नवस बोलतात, त्यांची कामना पूर्ण झाली की,पोतराजासह घरात पूजा, मंदिरात पूजा केली जाते. आषाढाच्या महिनाभरात तीन -चार हजाराची दक्षिणा मिळते. वर्षभर मात्र घर कसं चालवायचं हा प्रश्न असतो. मग आम्ही मोलमजुरी करून जगतो.
हलगीवाले बनसोडे म्हणाले, पोतराज हा कलाकारच असतो. तो माणसाच्या करमणुकीसाठी नाही; पण देवासाठी आपली कला सादर करत असतो. त्यामुळे पोतराजाला कलाकाराच्या निकषामध्ये बसवून त्याला वृध्द कलाकारासारखे मानधन दिले पाहिजे. आमची कोणती संघटना नाही. त्यामुळे आम्ही सरकारकडे भांडू शकत नाही; पण आमच्यासाठी कुणीतरी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
समाज प्रबोधनामुळे पोतराजी झाली कमी
पोतराजांची संख्या ७० टक्क्यांनी घटल्याचे त्यांनीच सांगितले. समाजामध्ये समाजप्रबोधन प्रभावीपणे झाले आजही ते सुरूच आहे. त्यामुळे पोतराजाची प्रथा बंद होऊ लागली. याशिवाय आमच्या घरातील मुलंबाळं शहाणी झाली. त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजून आले. त्यामुळे ती अगदी उच्च शिक्षणही घेऊ लागली. पोतराजी करण्यापेक्षा चार बुकं शिकणं शहाणपणाचं आहे, हे त्यांना समजल्यामुळेच आमची संख्या रोडावली, असे पोतराजांनी सांगितले.
 
जबरदस्ती करणार नाही!
मी पोतराज झालो. आमच्या घरातील परंपरेप्रमाणे माझ्या मुलानेही पोतराज झाले पाहिजे, पण माझ्या मुलाला शिकायची इच्छा असेल किंवा त्याला पोतराजी न करता नोकरी, व्यवसाय करायचा असेल, तर मी मुलाला अडविणार नाही. पोतराज होण्याची त्याला कधीच जबरदस्ती करणार नाही, असे संभाजी राजगुरू यांनी सांगितले.
 

Web Title: Potaraj wants a pension like old artists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.