‘भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे पोटशूळ’
By admin | Published: July 13, 2017 02:04 AM2017-07-13T02:04:25+5:302017-07-13T02:04:25+5:30
भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला असावा
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भाजपाची कामे दिसू लागल्यामुळे शीतल म्हात्रे यांनी राजशिष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला असावा, असे स्पष्ट मत, उत्तर मुंबई भाजपा सरचिटणीस आणि मुंबई महानगर पलिकेतील भाजपाचे स्वीकृत नगरसेवक गणेश खणकर यांनी केले. ‘प्रभागात खासदार आमदारांची घुसखोरी’ या संदर्भात ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताचे उत्तर मुंबईत जोरदार पडसाद उमटले.
स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता, महापालिका अधिकाऱ्यांसोबत भाजपा आमदार व खासदार यांचे कार्यक्रम ठरविले जात असल्याबद्दल, आर/ मध्य व आर/उत्तर प्रभाग समितीच्या अध्यक्षा नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी तक्रार केली आहे. ही तक्रार करताना, आर मध्य आणि आर उत्तरच्या प्रभाग समिती अध्यक्ष व प्रभाग क्रमांक सातच्या शिवसेना नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी त्याला राजशिष्टाचाराचा मुलामाही दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. एवढी वर्षे भारतीय जनता पक्ष संधीची वाट पाहत होता, संधी मिळाल्यानंतर भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामामुळे उत्तर मुंबईतून महापालिकेत ४२ पैकी २४ नगरसेवक भाजपाचे निवडून गेले आहेत.
गेली अनेक वर्षे दहिसर विभागात शिवसेनेचे नगरसेवक सातत्याने निवडून येत आहेत. प्रभाग समितीही बराच काळ शिवसेनेच्या ताब्यात होती, असे असूनही दहिसर नदीच्या बाबतीत कुठलाच ठोस कार्यक्रम अथवा दहिसर नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी कुठलेच पाऊल उचलले गेलेले नाही. परंतु गेल्या विधानसभेत दहिसर विधानसभेतून मनिषा चौधरी भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आल्या. त्यांनी दहिसर नदीच्या विषयात हात घालून काम सुरू केले. अनेक सामाजिक संस्था यात जोडल्या गेल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर नागरिकही यात सहभागी होत आहेत. शासकीय पातळीवर या संदर्भात हालचालीही सुरू झाल्या आहेत. यापूर्वी दहिसर विधानसभेत विनोद घोसाळकर शिवसेनेचे आमदार असताना, हा सवाल शीतल म्हात्रे यांनी का उपस्थित केला नाही? असा सवालही खणकर यांनी पत्राद्वारे उपस्थित केला आहे.