खड्डे दुरुस्ती रखडलेलीच
By admin | Published: November 4, 2016 12:46 AM2016-11-04T00:46:49+5:302016-11-04T00:46:49+5:30
डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
पुणे : पावसाळा संपल्यानंतर खड्डे पडण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी पूर्वी तात्पुरती डागडुजी केलेले खड्डे उखडले जात असल्याने त्यांचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा संपल्यानंतर खड्ड्यांविषयीच्या तक्रारींबाबत प्रशासनाचे गांभीर्य कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. तात्पुरती डागडुजी केलेले रस्ते पूर्ववत चांगले करण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पावसाळ्यामध्ये शहरातील जुन्या रस्त्यांबरोबर नुकतेच केलेल्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर यंत्रणा राबविली गेली, खड्ड्यांची तक्रार आल्यानंतर ते २४ तासांच्या आत बुजविण्याची व्यवस्था उभारण्यात आली. खड्डे बुजविण्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या. मात्र पावसाळा संपताच खड्ड्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.
खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्यासाठी मोबाइल अॅप, महापालिकेचे संकेतस्थळ यांसह ट्विटर, फेसबुकवरूनही तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाळ्याच्या काळात महापालिकेकडे महिन्याला सरासरी १५० खड्ड्यांच्या तक्रारी येत होत्या. आॅक्टोबर महिन्यात तक्रारींचे हे प्रमाण ७० इतके होते. मात्र तक्रार केल्यानंतर पूर्वी ज्या वेगाने २४ तासांच्या आत खड्डे बुजविले जात होते, तितक्या वेगाने आता कार्यवाही होताना दिसून येत नाही. सध्या खड्ड्यांच्या २६ तक्रारी प्रलंबित आहेत.
सातारा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते, पावसाळ्यात ते बुजविण्यात आले. मात्र, तात्पुरत्या डागडुजीनंतर ते पुन्हा उखडले गेले आहेत. स्वारगेट चौकामध्ये उड्डाणपुलाच्या बाजूला खड्डे बुजविण्यासाठी टाकलेले डांबर निघून गेल्याने पुन्हा खड्डे उघडे पडल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागांमधील पेठ परिसरामध्येही ठिकठिकाणी रस्ते उखडले गेले आहेत. उपनगरांमधील रस्त्यांची परिस्थिती आणखीनच वाईट आहे.
(प्रतिनिधी)
>खडडे बुजविण्यासाठी सध्या ४ मोबाइल व्हॅन कार्यान्वित असून येत्या २ महिन्यात आणखी ८ मोबाइल व्हॅन कार्यान्वित होणार आहे. सध्या खडयांच्या तक्रारी मात्र खुपच कमी झाल्या आहेत.
- राजेंद्र राऊत,
पथ विभाग प्रमुख
>खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रलंबित
शहरामध्ये मोबाइल, गॅस कंपन्या, महावितरण यांच्याकडून सेवावाहिनी टाकण्यासाठी केल्या जात असलेल्या खोदाईमुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडून रस्त्यांची दुरवस्था होते. या पार्श्वभूमीवर खड्डेमुक्त सेवावाहिनी टाकण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला आहे. मात्र, स्थायी समितीकडून दोन महिने उलटले तरी त्याला अद्याप मान्यता देण्यात आलेली नाही. शहरात पुढील वर्षभरात मोठ्या प्रमाणात खोदाई करण्याचे कंपन्यांचे नियोजन आहे, त्यामुळे पुन्हा आणखी खड्ड्यांचा करावा लागणार आहे.
>मणक्याच्या आजाराला आमंत्रण
खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीच्या तसेच मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहेत. सकाळी व संध्याकाळच्या वेळी वाहतूककोंडीबरोबर खड्डे चुकविण्याचीही मोठी कसरत नागरिकांना करावी लागत आहे. त्यामुळे तात्पुरत्या डागडुजी केलेल्या खड्ड्यांची योग्यप्रकारे दुरुस्ती केली जावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.