मॅरेथॉन आणि गणेशोत्सवावर खड्ड्यांचे सावट

By admin | Published: August 23, 2016 03:29 AM2016-08-23T03:29:09+5:302016-08-23T03:29:09+5:30

येत्या रविवारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा असून पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे.

The potholes fall on marathons and Ganeshotsav | मॅरेथॉन आणि गणेशोत्सवावर खड्ड्यांचे सावट

मॅरेथॉन आणि गणेशोत्सवावर खड्ड्यांचे सावट

Next


ठाणे : येत्या रविवारी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा असून पुढील महिन्यात पहिल्या आठवड्यात गणरायाचे आगमन होणार आहे. परंतु ठाणे शहरात मॅरेथॉनच्या मार्गासह शहराच्या इतर भागांतही रस्त्यांवर आजही खड्डे आहेत. त्यामुळे मॅरेथॉन स्पर्धा आणि बाप्पांचे आगमन हे यंदाही या खड्ड्यांतूनच होणार असे चित्र आहे. ही अवस्था असताना पालिकेच्या रेकॉर्डवर केवळ १४० खड्डे शहरात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
यंदा पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडणार नसल्याचा पालिकेचा दावा सध्या फोल ठरला आहे. पावसाची अडचण सांगून ते बुजवण्यास अडचण होत असल्याचे मत पालिकेकडून व्यक्त केले जात होते. परंतु, दुसरीकडे ते बुजवूनदेखील पुन्हा त्याचत्याच भागात खड्डे पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे रुंदीकरण केलेल्या रस्त्यांवर त्यांची संख्याही अधिक आहे. घोडबंदर भागातील सर्व्हिस रोडदेखील खड्ड्यांनी व्यापला आहे. खड्डे तत्काळ बुजवून ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी पालिकेने अत्याधुनिक स्वरूपाची जेट पॅचर ही यंत्रणादेखील वापरली. परंतु, ती फोल ठरली आहे. एकूणच पालिकेने पावसाळ्यापूर्वी जो दावा केला होता, तो दावा अक्षरश: फोल ठरला आहे.
दरम्यान, आता येत्या रविवारी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठाण्यात रंगणार आहे. मागील वर्षीही मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांना खड्ड्यांचा अडथळा पार करावा लागल्याने काहींना अपेक्षित यशापासून दूर राहावे लागले होते. तर, गणेशोत्सवाचे आगमनदेखील असेच झाले होते. असे असताना आता येत्या रविवारी २७ वी महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ठाण्यात रंगणार आहे. महापौर आणि स्थायी समिती सभापतींनी खड्डे बुजवण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. परंतु, अद्यापही ते बुजवण्यास वेग काही वाढलेला नाही. त्यात मागील काही दिवस कमी असलेला पावसाचा जोर सोमवारपासून पुन्हा वाढल्याने बुजवलेले खड्डे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
>मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गावरील सर्व कामे लवकर पूर्ण करा
ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २७ वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन २८ आॅगस्ट रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या मार्गाची पाहणी सोमवारी महापौर संजय मोरे यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत केली. राज्यपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते सुस्थितीत असून काही ठिकाणी असलेले खड्डे भरणे व इतर सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. या पाहणी दौऱ्यास सभागृह नेत्या अनिता गौरी, नगरसेवक नरेश मणेरा, नगरअभियंता रतन अवसरमल उपस्थित होते. तांत्रिक समितीचे ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष प्रमोद कुलकर्णी, विजय कुलकर्णी, अशोक आहेर तसेच सहायक पोलीस आयुक्त साहेबराव गीते, पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे उपस्थित होते.

Web Title: The potholes fall on marathons and Ganeshotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.