गणेशभक्तांच्या वाटेत खड्डे; मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, चाकरमान्यांचा प्रवास खडतर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 06:58 AM2022-08-08T06:58:32+5:302022-08-08T06:58:37+5:30
दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो.
- अनिल पवार
नागोठणे : गेले काही वर्षे दुरवस्थेच्या गर्तेत अडकलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची व्यथा, महामार्गाचा वनवास काही केल्या संपत नाही. यामुळे कोकणवासीयांना या मार्गावरून प्रवास करताना सर्वात जास्त अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अपूर्ण अवस्थेत असलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावर दरवर्षीच पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडतात. यामुळे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची डोकेदुखी वाढते.
दरवर्षी कोकणात गौरी-गणपती सणासाठी चाकरमान्यांना या खड्डेमय मार्गावरूनच प्रवास करावा लागतो. यावर्षीही महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर पळस्पे-इंदापूर या पहिल्या टप्प्यातील वडखळ ते इंदापूर या दरम्यान डोळवी, गडब, आमटेम, पळस, नागोठणे ते कोलाड दरम्यान तसेच कोलाड ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.
काही ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदापूर येथील आयोजित भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमात मुंबई-गोवा महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम एका वर्षात पूर्ण होईल अशी ग्वाही दिली होती; मात्र अद्यापही कासू ते कोलाड दरम्यान सिमेंट काँक्रीट रस्ता अर्धवट स्थितीत आहे. दरम्यान, हा महामार्ग म्हणजे प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरला आहे. दुरवस्थेमुळे सतत कोंडी होत असते.