पंतप्रधान मुद्रा योजनेचा बोजवारा
By admin | Published: October 12, 2015 01:46 AM2015-10-12T01:46:26+5:302015-10-12T01:46:26+5:30
बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगार अनभिज्ञ; मोठय़ा व्यापा-यांना होत आहे कर्ज वाटप.
बुलडाणा: छोट्या उद्योजकांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली पंतप्रधान मुद्रा योजना पहिल्या टप्प्यातच बारगळली आहे. बँकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याने अनेक बेरोजगार या चांगल्या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. जिल्ह्यातील अनेक बँकांमध्ये या योजनेचे अर्जच उपलब्ध करण्यात आलेले नाहीत. काही बँका कागदपत्रांसाठी अडवणूक करीत असल्याची नागरिकांची ओरड आहे. तर अनेक बँकांनी टार्गेट पूर्ण करण्यासाठी जुन्याच खातेदारांच्या नावे कर्ज प्रकरणे करून मोकळे झाले आहेत. ५0 हजार ते १0 लाख अशा तीन टप्प्यांत ही कर्ज योजना आहे. शिशू, मध्यम व मोठे असे वर्गीकरण या योजनेमध्ये करण्यात आले आहे; मात्र विशिष्ट बँकेत विशिष्ट परिसरातील व्यक्तींनाच कर्ज दिले जाईल, अशी अटही बँकांनी घातल्याने नागरिकांना इतर राष्ट्रीयीकृत बँकांचे उंबरठे झिजविण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात सर्व बँक प्रमुखांची बैठक घेऊन योग्य ते दिशानिर्देश द्यावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात लिड बँकेचे व्यवस्थापक पी. एम.शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेले टार्गेट पूर्ण करण्याबरोबरच नियमानुसार कर्जवाटप करण्याची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. नागरिकांच्या तक्रारी असल्यास संबंधित बँक अधिकार्यांना समज दिल्या जाईल, असे सांगीतले.
*काय आहे मुद्रा कर्ज योजनेमध्ये?
मुद्रा कर्ज योजनेंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांत कर्जाचे वितरण होणार आहे. शिशू योजनेंतर्गत ५0 हजार, किशोर योजनेंतर्गत ५ लाख व तरुण योजनेंतर्गत १0 लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. शासकीय जाहिरातीत शिशू, किशोर आणि तरुण मुद्रा लोन योजना वाटप प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगण्यात ये ते; मात्र बहुतांश बँकांमध्ये केवळ ५0 हजारांचे कर्जवाटप सुरू आहे. त्यातही कर्जदाराला योग्य मार्गदर्शन न करता चुकीची माहिती देऊन बँका दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे या योजनेला जिल्ह्यात फारसा प्रतिसादही मिळत नसल्याचे दिसत आहे.
*बँकांनी असाही वापरला फंडा
छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायामध्ये वृद्धी व्हावी, त्यांचा व्यवसाय चांगला चालावा यासाठी मुद्रा कर्ज योजनेंतर्गत पतपुरवठा केल्या जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक बँकांना टार्गेट देण्यात आले आहे; मात्र काही बँकांच्या अधिकार्यांनी नवीन कर्ज प्रकरणे करून पुन्हा वसुलीचा डोक्याला ताप नको म्हणून त्यांच्याकडे असलेल्या व्यापारी खातेदारांना फोन करून त्यांचे अर्ज भरून घेतले व त्यांना आवश्यकता नसताना कर्ज वाटप केल्याची बाब उघड होत आहे. बँक अधिकार्यांच्या या धोरणामुळे शासनाच्या एका चांगल्या योजने पासून सामान्य नागरिक वंचित राहत आहेत.
*अधिका-याच्या तोंडावर भिरकावले कागद
येथील विदर्भ कोंकण बँकेत हॉटेल व्यावसायिक आंबादास वाणी यांनी ५0 हजार रुपयांचे कर्ज प्रकरण केले होते. बँकेने त्यांना १00 रुपयांचा स्टँप मागितला. स्टँप दिल्यानंतर त्यांना बँकांचे नाहरकत प्रमाणपत्र आणण्याचे सांगितले. त्यातही तुम्हाला केवळ २0 हजार रुपयेच देऊ, असे बँकेचे अधिकारी पठाण यांनी सांगितले. ५0 हजार रुपयांची तरतूद असताना २0 हजार रुपयेच का मंजूर करता, यावर बँक अधिकारी व वाणी यांच्यात वाद झाला. शेवटी व्यावसायिक वाणी यांनी अधिकार्याच्या अंगावर कागद भिरकावून निघून आले.