कचऱ्यापासून प्लायवूड!
By admin | Published: June 26, 2015 02:11 AM2015-06-26T02:11:42+5:302015-06-26T02:11:42+5:30
राजकोट इथल्या हेतल वैष्णव या नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने कचऱ्यात टाकून दिलेल्या ब्रँडेड वेफर्स, चिप्सच्या पिशव्या नीट साफ करून त्यांचे बारीक तुकडे केले.
हेमंत लागवणकर -
राजकोट इथल्या हेतल वैष्णव या नववीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने कचऱ्यात टाकून दिलेल्या ब्रँडेड वेफर्स, चिप्सच्या पिशव्या नीट साफ करून त्यांचे बारीक तुकडे केले. हे तुकडे मग तिने तापवले. पॉलिथीन असल्यामुळे उष्णता दिल्यावर हे तुकडे वितळले आणि थंड झाल्यावर घट्ट झाले. घट्ट झालेले तुकडे हेतलने चक्क मिक्सरमधून फिरवले आणि त्याची पावडर बनवली. या पावडरमध्ये योग्य ते चिकटवणारे मिश्रण घालून त्यापासून तिने प्लायवूडसारख्या फळ्या तयार केल्या. तयार झालेल्या या फळ्यांच्या हेतलने चाचण्या घेतल्या. या फळ्यांवर रंग बसतो का, त्यावर सनमायका चिकटतो का, फळ्यांमध्ये स्क्रू घट्ट बसतो का, पाण्याचा काही परिणाम होतो का, हे तपासलं. ही फळी किती वजन पेलू शकते, याच्याही चाचण्या घेतल्या. या सगळ्या चाचण्यांचे निष्कर्ष समाधानकारक आले. थोडक्यात, कचऱ्यात टाकून दिलेल्या ब्रँडेड वेफर्स आणि चिप्सच्या पिशव्यांपासून प्लायवूडला एक सशक्त पर्याय हेतलने शोधला. या शोधाचं तिला पेटंटसुद्धा मिळालं आहे. सध्या हेतल विज्ञान महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत आहे. समाजोपयोगी संशोधन कार्य करण्याची तिची इच्छा आहे.