सत्तेचे बाळकडू

By admin | Published: June 19, 2015 04:41 AM2015-06-19T04:41:57+5:302015-06-19T04:41:57+5:30

गांधीद्वेषाने पछाडलेला मोठा वर्ग आरएसएसच्या स्वरूपात शिस्तबद्धरीत्या एकवटला. त्यातूनच जनसंघ नावाची अनौरस संतती निर्माण झाली.

Power baby | सत्तेचे बाळकडू

सत्तेचे बाळकडू

Next

- हेमंत देसाई

‘गांधीद्वेषाने पछाडलेला मोठा वर्ग आरएसएसच्या स्वरूपात शिस्तबद्धरीत्या एकवटला. त्यातूनच जनसंघ नावाची अनौरस संतती निर्माण झाली. संतती अनौरस असल्याने बाप पोराची आणि पोर बापाची जबाबदारी टाळत राहिला’, हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे उद्गार होते. ११ जानेवारी १९८१ च्या ‘मार्मिक’मध्येही त्यांनी ‘वाजपेयी’सारखा स्वार्थी, कृतघ्न माणूस जगाच्या इतिहासात सापडणार नाही, असे तिखट प्रतिपादन केले होते. त्याच बाळासाहेबांनी हिंदुत्वाची भगवी शाल पांघरून भाजपाला जवळपास २५ वर्षे ‘ये दोऽऽस्ती हम नहीं तोडेंगे’ असे म्हणत दृढालिंगन दिले. २0१४ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्यावर ‘दुनियादारी’साठी दोस्ती तोडली आणि सत्तेचे क्षितिज दिसताच, ‘छोडो कल की बातें’ म्हणत मैत्रीचा हात पुढे केला...याला म्हणतात स्वाभिमानी लवचीकता!

मुंबई महाराष्ट्राची, नाही कुणाच्या बापाची, असा अभिमान जागवत १९ जून १९६६ रोजी मुंबईत शिवसेनेची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मराठीजनांना सोनियाचे दिस येतील, असे वाटले होते. मुंबईच्या आर्थिक नाड्या सिंधी-मारवाडी-गुजराती-उत्तर प्रदेशी-पंजाब्यांकडे असून, मराठी माणसास नोकरीधंद्यात डावलले जात आहे या भावनेस फुंकर घालण्याचे काम सेनेने केले. सेनेच्या स्थापनेपूर्वी ‘मार्मिक’ साप्ताहिकातून बाळासाहेब या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत होते. गंमत म्हणजे, ज्यांनी ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरूंना मोठे मानले’ अशी टीका केली गेली, ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच ‘मार्मिक’चे प्रकाशन झाले. शिवसेनेच्या पहिल्या मेळाव्यास प्रबोधनकार ठाकरे, रामराव आदिक व शाहीर साबळे प्रभृती उपस्थित होते.
८0 टक्के समाजकारण व २0 टक्के राजकारण करू, असे बाळासाहेब सांगत. स्थापनेनंतरच्या एक वर्षात सेनेने राजकारणात प्रवेश केला आणि हळूहळू समाजकारण कमी होऊन, त्याची जागा ‘अर्थ’कारणाने घेतली. गिरण्यांमधून कम्युनिस्ट संघटनांना हुसकावणे, कॉ. कृष्णा देसाईचा खून करून महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या घडवून आणणे, १९६९ च्या भिवंडी दंगलीच्या वेळी हिंदूंची तारणहार ही प्रतिमा बनवणे, दाक्षिणात्यांना लक्ष्य करणे यातून पक्षाची आक्रमकता तयार झाली.
१९६८ मध्ये सेनेने महापालिका निवडणूक लढवली. मात्र विधानसभेत सेनेचा पहिला उमेदवार निवडून आला तो १९७0 साली. कृष्णा देसार्इंच्या परळ विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचे वामनराव महाडिक निवडून आले. त्यांना जनसंघ, हिंदू महासभेचा पाठिंबा होता, तेव्हा ‘आमचा विजय हा हिंदुत्वाचा, म्हणजेच राष्ट्रीयत्वाचा’ असल्याचे विचार बाळासाहेबांनी व्यक्त केले होते. देशात अडवाणींनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली, ती १९८५ च्या शाहबानू खटल्याच्या पाश्वर्भूमीवर. त्या वेळी १९८७ मधील विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने जरी जनता दलाचे उमेदवार प्राणलाल व्होरांना समर्थन दिले होते, तरी रा. स्व. संघ तेव्हा सेनेमागे उभा राहिला; कारण सेनेने कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतली. सेनेला तेव्हा विजयही मिळाला.
भाजपाने १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथम सेनेशी युती केली होती. परंतु १९८५ च्या विधानसभेला भाजपाने सेनेला टाटा, बाय बाय करून, शरद पवार यांच्या पुलोदमध्ये वस्ती केली. ‘१९९३ च्या मुंबई दंगलीत सेना सक्रिय होती. सेना नसती तर या दंगलीत हिंदू उरले नसते’ असे विधान बाळासाहेबांनी केले. त्याआधी बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी भाजपा टाळत असताना, बाळासाहेबांनी त्याचेही जाहीरपणे ‘श्रेय’ घेतले! राडा हा शब्द सेनेने इतका प्रचलित केला की, भाऊ पाध्येंनी ‘राडा’ ही कादंबरीदेखील लिहिली!
प्रश्न असा आहे की, राडेबाजी व दंगली करूनही शिवसेनेला त्या प्रमाणात यश मिळालेले नाही. पक्षाची स्थापना झाल्यानंतर सेनेला २९ वर्षांनी राज्यात सत्ता मिळाली. उलट आंध्रमध्ये रामाराव यांनी तेलुगू अस्मितेच्या मुद्द्यावर ‘तेलुगू देसम’ची स्थापना केली व दोन-अडीच वर्षांत सत्ता मिळवली. ‘आसाम गण परिषदेने’ही अल्पावधीत स्वत:चे सरकार स्थापले. १९९५ मध्ये सेनेला सत्तेत जाता आले तेही भाजपाच्या मदतीने. शिवाय तेव्हा हिंदुत्वाची लाट होती आणि आरोपांमुळे शरद पवार यांची लोकप्रियता घसरणीस लागली होती.
युतीचा कारभार अंदाधुंद होता आणि उड्डाणपूल व पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग या ज्या कामांचे कौतुक बाळासाहेबांनी केले, त्याचे श्रेय भाजपास जाते. सत्ता गेल्यानंतर ती पुन्हा मिळवण्यासाठी घोडेबाजार करून चमत्कार करण्याचे प्रयत्न झाले, ते विफल ठरले. मुंबई, ठाणे इत्यादी महापालिकांत सेना सत्तेवर असली, तरी तेथील कारभार टक्केवारीचा व कमालीचा भ्रष्ट आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व गणेश नाईक मूळचे उलाढाली शिवसैनिक. परंतु त्यांची प्रतिमा वादग्रस्त व कलंकित राहिली.
शिवसेनेचा सुवर्णमहोत्सवी ताळेबंद मांडला, तर गिरणी कामगारांची थकीत देणी मिळावीत म्हणून प्रयत्न झाले. एअर इंडिया, आरसीएफ वगैरेंत भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी यशस्वी धडपड झाली. महामुंबई सेझला विरोध करून, हा प्रकल्प हाणून पाडून, शेतकऱ्यांना जीवदान दिले गेले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्युअल क्लासरूमसारखी योजना राबवली. संयुक्त महाराष्ट्राचे संग्रहालय साकारले.
मात्र बेरजेपेक्षा वजाबाकी जास्त आहे. राज ठाकरेंसह अनेक नेते पक्ष सोडून गेले. काँग्रेसप्रमाणे सेनेतही दरबारी राजकारण शिरले. सेनेने कधीही स्वच्छ कारभार, कार्यक्षमता, विकास याकडे लक्ष दिले नाही. मुंबई महापालिकेतही घोटाळ्यांचे सिंचन होत आहे. फडणवीस सरकारमधील सेनेच्या एका मंत्र्यावर तर बोगदा चाळ प्रकरणात गंभीर आरोप झाले आहेत. मराठी माणसास नोकऱ्या मिळाव्यात यासाठी लोकाधिकार समितीने सुधीर जोशींच्या नेतृत्वाखाली खूप काम केले. पण आज शिववड्याच्या पलीकडे जाऊन स्वयंरोजगार, लघुउद्योग, स्टार्टअप्स याकडे तरुणांना वळवले पाहिजे. गुजरात्यांकडून व्यापार, दाक्षिणात्यांकडून नोकरीतील नेकी, भैयांकडून कष्ट आणि मुसलमानांकडून कारागिरी शिकून घेतली पाहिजे. मात्र शिवसेनेने गंभीर अर्थकारणास कधीच महत्त्व दिले नाही. रामदास कदमांसारख्या नेत्यांनी ‘सेनेची काँग्रेस झाली आहे’ अशी टीका केली होती. पण काँग्रेसला आर्थिक प्रश्न तरी समजतात. भाजपाला देशी-आंतरराष्ट्रीय प्रश्नांचे आकलन आहे. शिवसेना प्रादेशिक पक्ष असला, तरी आज मोदींच्या भारतात राष्ट्रीय धोरणे ठरवताना, राज्यांना विचारात घेतले जात आहे. राज्यांचे मुख्यमंत्री पंतप्रधानांसमवेत विदेश दौरे करत आहेत.
शिवसेनेचे मात्र भावनाप्रक्षोभी, अन्यायग्रस्तप्रधान व नकारात्मक राजकारण सुरू आहे. स्वाभिमानी गीते गात साष्टांग नमस्कार घालणे, जैतापूरपासून विविध प्रश्नांबाबत भूमिका बदलणे, कधी माघार घेणे, टोप्या फिरवणे हे प्रकार लोक बघत आहेत. अमितशाहीवर हल्ला चढवत, मग देवेंद्रच आमचा इंद्र म्हणत सरकारात जाणे हेही जनतेने पाहिले आहे. घराणेशाही सार्वत्रिक आहे. ती असू द्या. परंतु नव्या जगाचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्याची तयारी सेनेने केली पाहिजे. पन्नाशीनंतर तरी माणसाने प्रगल्भ व्हावे, अशी अपेक्षा असते. तेव्हा ‘आपुलाचि वाद आपणासी’ करत सेनेने जरा स्वत:च्या आत डोकवावे. आपला ‘सामना’ दुसऱ्याशी नव्हे, तर स्वत:शीच आहे, हे लक्षात घ्यावे.

Web Title: Power baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.