खडसे समर्थकांचं शक्तिप्रदर्शन, जळगावातले 15 नगरसेवक देणार राजीनामा
By admin | Published: June 1, 2016 05:24 PM2016-06-01T17:24:50+5:302016-06-01T17:52:58+5:30
महसूलमंत्रिपदासह अनेक खाती सांभाळणा-या एकनाथ खडसेंचं मंत्रिपद काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच खडसे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन सुरू केलं
Next
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. ०१ - महसूलमंत्रिपदासह अनेक खाती सांभाळणा-या एकनाथ खडसेंचं मंत्रिपद काढून घेण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच खडसे समर्थकांनी त्यांच्या समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन सुरू केलं आहे. खडसेंच्या समर्थनार्थ जळगावातले भाजपचे 15 नगरसेवक राजीनामा देणार आहेत. जळगाव येथे बैठकीत नगरसेवकांनी हा निर्णय जाहीर केला असून, नगरसेवकांनी अंजली दमानिया यांचाही निषेध केला. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे राजीनामा सोपवणार असल्याचीही घोषणा यावेळी नगरसेवकांनी घोषणा केली.
दाऊद फोनकॉल, भोसरी एमआयडीसी जमीन आणि त्यांचा कथित पीए गजानन पाटलाच्या लाच मागण्याच्या प्रकरणांमुळे खडसे पुरते अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनीही खडसेंच्या राजीनाम्याची निवेदनाद्वारे थेट राज्यपालांकडे मागणी केली आहे. कॅबिनेट बैठक सोडूनही काल खडसे मुक्ताई देवीच्या यात्रेला गेले होते. त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जवळपास जाणार या चर्चांना उधाण आलं होतं.
एकनाथ खडसे समर्थकांच्या शक्तिप्रदर्शनामुळे रावसाहेब दानवेंनीही खडसेंना पाठिंबा दिला आहे. भाजपा एकनाथ खडसेंच्या पाठीशी असल्याचं यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी सांगितलं आहे.