अपयश पचविण्याची ताकद हवी

By admin | Published: December 25, 2015 03:19 AM2015-12-25T03:19:54+5:302015-12-25T03:19:54+5:30

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

The power to digest failure | अपयश पचविण्याची ताकद हवी

अपयश पचविण्याची ताकद हवी

Next

मुंबई : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे गुरुवारी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जीवनात यश मिळवायचे असेल, तर आधी अपयश पचविण्याची ताकद युवकांनी अंगी बाणवायला हवी. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करीत ते म्हणाले की, ‘माणसाचा साधेपणा हा प्रचाराचा नव्हे, तर स्वभावाचा भाग व्हायला हवा,’ असे पर्रिकर यांनी यावेळी सुनावले.
अभाविपमार्फत २४ ते २६ डिसेंबर दरम्यान, वांद्रे येथील महात्मा ज्योतिबा फुले नगरात सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले. अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी पर्रिकर बोलत होते. यावेळी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांच्यासह अभाविपचे पदाधिकारी उपस्थित होते.
संयमाने ताकद वाढते, विनयाने धार चढते. त्यामुळे प्रत्येकाने आपली स्वत:ची अशी ताकद निर्माण करणे आवश्यक आहे. प्रत्येक माणूस हा जन्मभर विद्यार्थी असतो. त्यामुळे आपणही आयुष्यभर विद्यार्थी परिषदेचे सदस्य असणार आहोत.
आजच्या युगात विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अभाविप नेहमीच प्रयत्न करीत असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले. तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्या हस्ते स्व.अशोकजी शिंदे प्रदर्शनी कक्षाचे उद्घाटन झाले. या प्रसंगी अभाविपच्या कामाचे कौतुक करीत, अभाविपचे काम आजच्या काळात अपरिहार्य असल्याचे कुलगुरु म्हणाले.
चांगले चारित्र्य आवश्यक
चारित्र्याशिवाय विद्यासाधन व संपत्तीनिर्मिती शक्य नाही आणि आजवर भारतीय राज्यकर्त्यांनी नेमके याच विषयाकडे दुर्लक्ष केले आहे. गेल्या १५-२० वर्षांत महाराष्ट्रात शिक्षणाचे बाजारीकरण झाले. त्यातून डिग्री घेतल्यानंतर काय करायचे, याचा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला असल्याचे पर्रिकर म्हणाले.
आज यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण कठोर मेहनत आणि जिद्द हे यशाचे प्रमुख अंग आहेत. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्यावर माहितीचा भडिमार होतो आहे. आज सर्वांनाच तत्काळ माहिती हवी असते, पण असे असले, तरी आपल्याला मिळालेल्या माहितीची उपयुक्तता आपण तपासणे आवश्यक आहे.

Web Title: The power to digest failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.