धर्मसत्तेचा आधार असल्यास सत्ता भ्रष्ट होत नाही
By admin | Published: November 2, 2015 03:01 AM2015-11-02T03:01:48+5:302015-11-02T03:01:48+5:30
‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले
मुंबई : ‘धर्मसत्तेचा आधार असलेली सत्ता कधीच भ्रष्ट होत नाही,’ असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तब्बल अडीच हजार वर्षांतील सर्वात कठीण तपस्या असलेले ‘गुणरत्न संवत्सर तप’ श्री हंसरत्न विजयजी महाराज यांनी पूर्ण केले. त्या निमित्त रविवारी आयोजित केलेल्या पारणा महोत्सवात मुख्यमंत्री बोलत होते.
वांद्रे कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर झालेल्या या महोत्सवासाठी हजारो जैन अनुयायी एकवटले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राजसत्ता ही धर्मसत्तेपेक्षा श्रेष्ठ नाही. राज्याच्या कारभारात नैतिकता राहण्यासाठी धर्मसत्ता असावी लागते, तरच राज्यकारभार पारदर्शी राहतो. भारतीय संस्कृती ही नैतिकतेवरच आधारलेली आहे.’
‘श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या तपस्येमुळे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा समाजाला फायदा होईल,’ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
नाशिकच्या संघवी कुटुंबाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवंगत कांताबेन रसिकलाल संघवी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र संघवी आणि विलास संघवी या बंधुंनी कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला. यावेळी संघवी कुटुंबातील काश्मीराबेन, शिल्पाबेन, विराज, करण आणि स्तुती यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, श्रीहंसरत्न विजयजी महाराज यांच्या दर्शनासाठी अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. त्यात न्यायमूर्ती, प्रशासकीय अधिकारी आणि अनेक उद्योगपतींचा समावेश होता.
राज्याच्या विकासात
जैन समाजाचा वाटा
राज्याच्या विकासात जैन समाजाची मोठी भूमिका असल्याचे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले. ‘रोजगार निर्मितीमध्ये जैन समाजाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. व्यापार, उद्योग आणि रोजगारात या समाजाने मोलाचे योगदान दिले आहे. अन्य समाजाच्या लोकांना सोबत घेऊन जाण्याची मानसिकता या समाजाकडे आहे. शिवाय शांती आणि अहिंसेच्या मार्गावर चालणाऱ्या या समाजाने नेहमीच जीवनाचे अंतिम सत्य दाखवले आहे,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.