कोराडी ६६० मेगावॅट क्षमतेच्या संचातून वीजनिर्मिती
By admin | Published: December 23, 2015 02:06 AM2015-12-23T02:06:28+5:302015-12-23T02:06:28+5:30
महानिर्मितीच्या कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८मधून वाणिज्यिक तत्त्वावर वीज उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादन क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडली आहे.
मुंबई : महानिर्मितीच्या कोराडी येथील ६६० मेगावॅट क्षमतेच्या संच क्रमांक ८मधून वाणिज्यिक तत्त्वावर वीज उत्पादन सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याच्या वीज उत्पादन क्षमतेत ६६० मेगावॅटची भर पडली आहे. परिणामी, महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता १२ हजार ७७ मेगावॅट इतकी झाली असून, यामध्ये औष्णिक ८ हजार ६४० मेगावॅट, वायू ६७२ मेगावॅट, जलविद्युत २ हजार ५८५ मेगावॅट आणि सौरऊर्जा १८० मेगावॅटचा समावेश आहे.
महानिर्मितीच्या मालकीच्या १७२ हेक्टर जमिनीवर एकूण १ हजार ९८० मेगावॅट क्षमतेचा हा विशाल वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. प्रकल्पाकरिता छत्तीसगड येथील गरेपालम-२ या खाणीतून प्रतिवर्षी ९.१ दशलक्ष मेट्रीक टन म्हणजे प्रतिदिन २५ हजार मेट्रीक टन कोळशाची तरतूद आहे. प्रकल्पाकरिता आवश्यक पाणीपुरवठ्याबाबत नागपूर महापालिका आणि महानिर्मितीमध्ये १३० दशलक्ष लीटरचा सामंजस्य करार झाला आहे. भांडेवाडी प्रकल्पातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीकरिता पाण्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. देशातील अशा प्रकाराचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे. वीजनिर्मितीसाठी सांडपाण्याचा पुनर्वापर केल्याने शेतीसाठी अधिकचे पाणी उपलब्ध झाले आहे.
नागपूरमधील कोराडी गावात १९७० साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाने कोराडी औष्णिक विद्युत केंद्राची स्थापना केली होती. विद्युत संचाचे जुने तंत्रज्ञान, वाढते वयोमान, विजेची मागणी लक्षात घेता १२० मेगावॅट क्षमतेचे ४ संच कालपरत्वे बंद करण्यात आले. महानिर्मितीने त्याऐवजी कोराडी येथे सुपर क्रिटीकल तंत्रज्ञानावर आधारित प्रत्येकी ६६० मेगावॅट क्षमतेचे तीन अत्याधुनिक संच उभारणीचे काम हाती घेतले. देशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा या प्रकल्पाला केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ‘मेगा पॉवर प्रोजेक्ट’चा दर्जा बहाल केला आहे.