कर्तृत्वाला सन्मानाची उर्जा
By admin | Published: August 1, 2015 02:26 AM2015-08-01T02:26:50+5:302015-08-01T02:26:50+5:30
विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान ‘उर्जा पुरस्कार २०१५’या पुरस्काराने होणार आहे. महिला सबलीकरणाचा वसा घेतलेल्या युएसके फाऊंडेशनच्यावतीने हा
पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान ‘उर्जा पुरस्कार २०१५’या पुरस्काराने होणार आहे. महिला सबलीकरणाचा वसा घेतलेल्या युएसके फाऊंडेशनच्यावतीने हा पुरस्कार देण्यात येतो.
युएसके फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. यंदाच्या वर्षीचा शौर्य पुरस्कार अपंगात्वार मात करत पहिली अपंग महिला एव्हरेस्टवीर पद्मश्री अरूणिमा सिन्हा यांना जाहीर झाला आहे. अन्यायाचा विरोध करत कमानी ट्युब्जच्या संचालकपदापर्यंत पोहचण्याच्या जिद्दीचा गौरव म्हणून पद्मश्री कल्पना सरोज यांना पुरस्कार देण्यात येणार आहे तसेच अर्जुन पुरस्कार विजेत्या हीना सिद्धू यांना ‘उर्जा क्रीडा पुरस्कार’, हेल्पर्स आॅफ द हॅन्डीकॅप संस्थेच्या अध्यक्षा नसीमा हुरजूक यांना ‘उर्जा सामाजिक सेवा पुरस्कार’, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना ‘उर्जा कला पुरस्कार’ देण्यात येणार आहेत, अशी माहिती काकडे यांनी दिली.
वैद्यकीय उच्चशिक्षण असतानाही,व्यावसायिक लोभ सोडून मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आरोग्यासाठी आपले वैद्यकीय ज्ञान आणि आयुष्य समर्पित करणाऱ्या डॉ. स्मिता व डॉ. रविंद्र कोल्हे यांना ‘उर्जा जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर केला आहे. हा पुरस्कार सोहळा ४ आॅगस्ट रोजी दुपारी ३.३० वाजता बालगंधर्व रंगमदिर पुणे येथे होणार आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, कोकिलाबेन धीरूबाई अंबानी हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च इन्सिस्टट्युटच्या संचालिका टिना अंबानी, अपोलो हॉस्पिटलच्या संयुक्त कार्यकारी संचालिका संगीता रेड्डी, सुनेत्रा पवार, डॉ. विद्या येरवडेकर, शायना एन सी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
युएसके फाऊंडेशनतर्फे पुरस्कार : अरुणिमा सिन्हा, कल्पना सरोज, हिना सिध्दू, नसीमा हुरजूक, सोनाली कुलकर्णी, डॉ. स्मिता व रविंद्र कोल्हे यांना गौरविणार