ऊर्जा मंत्र्यांचा बाजोरियांना शॉक!
By admin | Published: July 26, 2016 02:10 AM2016-07-26T02:10:39+5:302016-07-26T02:10:39+5:30
राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांना आज विधानभवनात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच झापले. ऊर्जा विभागाविरुद्ध तुमच्याकडे पुरावेच होते तर तुम्ही सभागृहात
मुंबई : राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया यांना आज विधानभवनात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलेच झापले. ऊर्जा विभागाविरुद्ध तुमच्याकडे पुरावेच होते तर तुम्ही सभागृहात तोंड का उघडले नाही, असे बावनकुळेंनी बाजोरियांना सर्वांसमक्ष सुनावले. दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली पण भारी पडले ते बावनकुळेच.
विधान परिषदेत आज नियम २६० नुसार विरोधी पक्षाने विविध विभागांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. या विभागांमध्ये बावनकुळे मंत्री असलेल्या ऊर्जा विभागाचादेखील समावेश होता. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अन्य विभागांवर आरोप केले तथापि, ऊर्जा विभागावर कोणीही बोलले नाही.
त्यामुळे बावनकुळे यांनी सभागृहात अशी मागणी केली की माझ्या विभागाचे विरोधकांच्या प्रस्तावात नाव नाही, या विभागावर कोणी काही आरोपदेखील केलेला नाही तेव्हा प्रस्तावातून ऊर्जा विभागाचे नाव वगळावे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी त्यास मान्यता दिली. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी तसे निर्देशदेखील दिले.
चर्चा व त्यावरील मंत्र्यांची उत्तरे संपल्यानंतर विधानभवनाच्या लिफ्टजवळ बावनकुळेंना बघून बाजोरिया त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्याशी बोलू लागले. ऊर्जा विभागाचे माझ्याजवळ खूप पुरावे आहेत. मी एकेक काढू शकतो, असे ते म्हणाले. बावनकुळे यांनी तत्काळ आक्रमक होत बाजोरिया यांना धारेवर धरले. तुम्ही सभागृहाचे सदस्य आहात, चर्चा झाली तेव्हाही सभागृहात होता मग तेव्हाच पुरावे द्यायला हवे होते. माझ्या खात्याचा कारभार व्यवस्थित सुरु आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, असे बावनकुळे यांनी सुनावले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तितक्यात त्या ठिकाणी आले आणि त्यांनी बाजोरिया यांना आवरले. (विशेष प्रतिनिधी)