पवारांची पॉवर : मनोहर जोशींप्रमाणे मुख्यमंत्रीपदी ऐनवेळी लागणार संजय राऊतांची वर्णी ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 01:52 PM2019-11-22T13:52:43+5:302019-11-22T14:24:02+5:30
प्रशासकीय अनुभव कमी असल्याने उद्धव मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे, अनिल देसाई आणि संजय राऊत यांचे नाव आघाडीवर आहे.
मुंबई - गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या अवतीभवती फिरत आहे. मागील काही दिवसांत पवारांची राज्याच्या राजकारणावरची पकड सैल झाल्याची चर्चा सुरू होती. सत्ताधारी भाजपच्या चालींनी तशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर पवारांनी आपला करिष्मा दाखवत आपल्यासह काँग्रेसला सत्तेत परत आणल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. आता पवारांचा तोच करिष्मा खासदार संजय राऊतांना मुख्यमंत्री बनवतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एकमेकांचा चांगले मित्र. अनेक मुद्दांवर पवार आणि ठाकरे यांच्यात विरोध झाला. मात्र अनेकदा एकमतही झालं. आता पुन्हा या दोघांची मैत्री राजकीय वर्तुळात चर्चेत आली आहे. 1995 मध्ये जेव्हा पहिल्यांदा राज्यात युतीचं सरकार आलं होतं त्यावेळी शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरवताना पवारांची भूमिका महत्त्वाची ठरली होती.
बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुधीर जोशी यांचे नाव अंतिम केले होते. हेच अंतिम केलेले नाव सांगण्यासाठी त्यांनी पवारांना फोन लावला होता. त्यावेळी पवारांनी अडणाव जोशीच राहुद्या पण पहिलं नाव बदला असा सल्ला दिला होता. त्यानंतर बाळासाहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मनोहर जोशी यांच्यावर सोपवली होती. या संदर्भातील दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे 'आधारवड' या पुस्तकात करण्यात आलेला आहे.
आताही असच काही घडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र प्रशासकीय अनुभव कमी असल्याने उद्धव मुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. अशा स्थितीत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि संजय राऊत यांचे नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांच्यासाठी शरद पवारही सकारात्मक आहेत. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्रीपदी राऊतांची वर्णी लागते की काय, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.