जनतेची ताकद माझ्यासोबत
By admin | Published: November 7, 2016 06:11 AM2016-11-07T06:11:18+5:302016-11-07T06:11:18+5:30
निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे.
माणगाव (रायगड) : निवडणुका येतात जातात जय पराजय होत राहतो, सत्ता असली आणि नसली तरी लोकांचा विकास करण्याची दानत असली पाहिजे. सत्ता कोणाचीही असो रायगडात विकास मी करतोय तो जनतेच्या आशीर्वादावरती, कारण जनतेची खरी ताकद माझ्याच सोबत आहे. कुणी कितीही राजकारण केले तरी माझ्या पाठीशी असणाऱ्या लोकांच्या ताकदीला हात लावण्याची हिंमत कोणामध्येच नाही, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. लोणेरे येथे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फेआयोजित पक्षप्रवेश व रायगड भूषण पुरस्कार विजेत्यांचा सत्कार सोहळा समारंभ संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संपर्क नेते प्रमोद घोसाळकर, तालुकाध्यक्ष बाबूराव भोनकर, सभापती अलका केकाणे, राम टेंबे, राजिप सदस्या राधिका तटकरे आदी उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित केलेल्या अण्णा उचाटे,घनश्याम घोसाळकर, मजीद लोखंडे व सत्यभामा ढेपे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी लोणरे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी टेंबे, सीमा जाधव यांच्यासह युवा कार्यकर्ते समाधान करकरे, शैलेश टेंबे, दर्शना टेंबे, बाळाराम टेंबे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचा समाचार घेताना जनतेप्रति संवेदना नसलेला खासदार रायगडातून गेला अशी बोचरी टीका तटकरे यांनी केली. विकास आणि जनसेवा या सिद्धांतावर कधी आयुष्यात त्यांनी काम केले नाही.
मुख्यमंत्री पदाच्या जोडीचे मंत्रीपद केंद्रीय मंत्रिमंडळात मिळाले आहे,परंतु जनतेची सेवा करण्याची जाण त्यांना राहिली नाही. त्यांनी फक्त दुसऱ्यांवर टीका करूनच राजकारण करण्यात धन्यता मानली. त्यांना आगामी काळात जनताच धडा शिकवेल. सत्ता असली आणि नसली तरी लोकांची कामे होणारच यासाठी मी वचनबध्द असल्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले. (वार्ताहर)