सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा लखलखता त्रिवेणी संगम
By admin | Published: April 9, 2017 05:00 AM2017-04-09T05:00:24+5:302017-04-09T05:00:24+5:30
सेवाव्रती आणि कर्तबगार महाराष्ट्रीयनांचा महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यासाठी मंगळवार, ११ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने आयोजित केलेली सन्मान संध्या ही एक अपूर्व
- रामदास आठवले, प्रफुल्ल पटेल होणार मुलाखतकार; रणबीर कपूर - आलिया भट प्रथमच एका मंचावर; उपस्थितांनाही मिळणार सवालाची संधी
मुंबई : सेवाव्रती आणि कर्तबगार महाराष्ट्रीयनांचा महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्काराने गौरव करण्यासाठी मंगळवार, ११ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने आयोजित केलेली सन्मान संध्या ही एक अपूर्व सांस्कृतिक पर्वणी ठरणार आहे. राजकीय व्यासपीठावर आणि कला-संस्कृतीच्या रंगमंचावर आजवर जे कधीही घडले नाही, ते या सोहळ्याच्या रूपरेषेत दडले आहे. म्हणूनच तर सत्ता, कर्तृत्व आणि ग्लॅमरचा अपूर्व लखलखता त्रिवेणी संगम मंगळवारी सायंकाळी मुंबईतील अभिजनांना अनुभवता येणार आहे.
आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणारे सेवाव्रती आणि नामवंत अशा मांदियाळीच्या साक्षीने होऊ घातलेल्या या सोहळ्यातील सन्माननीय अतिथींची प्रभावळ हेवा वाटण्याजोगी आहे. विशेष म्हणजे या अतिथींपैकी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल हे मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. तर चंदेरी दुनियेवर विलक्षण ठसा उमटविणारे रणबीर कपूर आणि आलिया भट प्रथमच एका व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत.
रामदास आठवले हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार आहेत. एखाद्या केंद्रीय मंत्र्याने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याचा अपूर्व योग लोकमतच्या या सोहळ्यामुळे जुळून आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा प्रयोगाची नोंद आजवर झालेली नाही. शिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत प्रफुल पटेल घेणार असल्याने कार्यक्रमाच्या उंचीत भर पडणार आहे. विदर्भातील पारंपरिक विरोधक पण तरीही जपलेला व्यक्तिगत स्नेह असा दुपेडी आयाम लाभलेली पटेल-गडकरी यांची मुलाखतवजा जुगलबंदी हे सोहळ््याच्या रूपरेषेचे आकर्षण ठरू पाहात आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ््याचे मुख्य अतिथी तर आहेतच, शिवाय ‘आज तक’ वृत्त वाहिनीच्या प्रसिद्ध अँकर अंजना ओम कश्यप यांच्या उत्तर प्रदेश निवडणूक, काश्मीर, मोदींसमवेतचे अनुभव अशा अनेकविध प्रश्नांना ते वेगळ््या अर्थाने ‘लाइव्ह’ सामोरे जाणार आहेत.
यूपीएल प्रायोजित लोकमत "महाराष्ट्रीयन आॅफ द इयर" पुरस्कार सोहळ्यात माजी राष्ट्राध्यक्ष श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा विशेषत्वाने गौरव केला जाणार आहे. पुरस्कारासाठी नामांकन लाभलेल्यांमधून विजेता ठरणाऱ्यांखेरीज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जीवनविद्या मिशनचे विश्वस्त प्रल्हाददादा पै, अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वतीने नितीन जोशी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, रणबीर कपूर आणि आलिया भट यांना विशेष पुरस्काराने या सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे. महाराष्ट्राचे व्यक्तिस्वरूप मानबिंदू हेरून कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वांच्या कार्यावर कृतज्ञतेची मोहोर या पुरस्कारातून उमटणार आहे. लोकमताचा उदंड सहभाग आणि त्यानंतर नामवंत ज्युरींनी केलेली निवड या संपूर्ण पारदर्शी आणि विश्वासार्ह प्रक्रियेतून यूपीएल प्रायोजित पुरस्काराचे हे पर्व अजिंक्य डीवाय पाटील यांच्या सहयोगाने साकारत आहे.
महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुलाखतकाराच्या रूपाने प्रश्न विचारण्याची मिळालेली संधी अपूर्व आहे. या सवाल-जबाबात मुख्यमंत्री हजरजबाबी आणि प्रभावी ठरणार का, याबद्दल उत्सुकता आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री
‘लोकमत’शी असलेला ऋणानुबंध आणि
नितीन गडकरी यांच्याशी विरोधक आणि स्नेही असा दुपेडी संबंध बाजूला ठेवून ही मुलाखत अधिक खुमासदार करण्याचा माझा निरपेक्ष प्रयत्न राहील. एका परीने लोकमताची भावना गडकरींपर्यंत प्रश्नरूपात पोहोचविण्यास मी खूप उत्सुक आहे.
- खा. प्रफुल पटेल, माजी केंद्रीय मंत्री
महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा घेतलेला शोध आणि मान्यवर परीक्षक व मराठी जनतेचा त्यांना मिळालेला कौल लक्षात घेऊन गौरव करण्याची परंपरा आदर्शवत अशी आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या या उपक्रमामुळे निरलस आणि निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या अनेक व्यक्तींचा सार्थ गौरव झाला आहे.
- डॉ.उल्हास पाटील, अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन, जळगाव.
महाराष्ट्रीयन आॅफ द ईयर पुरस्कारांच्या निमित्ताने महाराष्टच्या सामाजिक जीवनातील कर्तृत्वाला सलाम ‘लोकमत’ करीत आहे. अनेक कर्तृत्ववानांचे कार्य यातून समाजापुढे येत आहे. आज समाजात आदर्शांची कमतरता आहे, असे म्हटले जात असताना ‘लोकमत’चा हा उपक्र म होतोय याला महत्व आहे. संपूर्ण राज्यातून रत्ने शोधून ही एखाद्या जोहरयाप्रमाणे पारखून घेण्यासारखेच हे आहे. समाजालाही मतदानाच्या रु पाने त्यामध्ये सहभागी करून घेणे निश्चितच कौतुकास्पद आहे.
- उषा संजय काकडे, अध्यक्ष, यूएसके फाऊंडेशन, पुणे