वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

By admin | Published: June 8, 2017 03:04 AM2017-06-08T03:04:29+5:302017-06-08T03:04:29+5:30

वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे.

The power sensor center makes it easy to face the disaster | वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

वीज सेन्सर सेंटरमुळे आपत्तीचा सामना करणे सोपे

Next

आविष्कार देसाई ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : वीज पडण्याचे संभाव्य धोके लक्षात घेऊन राज्यातील १६ ठिकाणी बसविण्यात आलेल्या वीज सेन्सर सेंटरचे काम चोखपणे होत आहे. मात्र, विविध जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला वीज पडण्याआधी दोन तास सूचना मिळूनही त्यांच्याकडून पुढील काम धीम्या गतीने होते. त्यामध्ये सुधारणा झाल्यास आपत्तीचा मुकाबला करणे अधिक सोपे होणार असल्याचे मत आयआयटीएमचे (भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्था) प्रकल्प संचालक डॉ.एस.डी.पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
पुण्याच्या आयआयटीएम संस्थेने पुणे, रत्नागिरी, अकोला, यवतमाळ, सोलापूर, वेंगुर्ला, लातूर, औरंगाबाद, जळगाव, चंद्रपूर, नागपूर, परभणी, नाशिक, बीड, कोल्हापूर आणि हरिहरेश्वर (रायगड) या ठिकाणी हे वीज सेन्सर सेंटर दोन वर्षांपासून उभारले आहेत. यासाठी सुमारे आठ कोटी रु पयांचा खर्च आला आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाबरोबरच वीज कोसळण्याचेही प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन वर्षांत वीज पडून २०० जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. ही आकडेवारी फक्त २५ जिल्ह्यातीलच आहे. जीवितहानीसह कोट्यवधी रु पयांची वित्तहानीही या आपत्तीमुळे झाली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे ठिकठिकाणी ३० वीज अटकाव यंत्रे बसवण्यात आली आहेत. मात्र वीज कुठे पडू शकते, वीज पडण्याचे प्रमाण का वाढले याचा अभ्यास करण्यासाठी तंत्रज्ञान बसवण्यात आले नव्हते. भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान विज्ञान संस्थेने राज्यात १६ ठिकाणी वीज सेन्सर सेंटर बसविले आहेत. वीज पडण्यापूर्वीच काही तास अगोदर वीज पडण्याचे नेमके ठिकाण एसएमएसद्वारे प्रत्येक जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला कळविण्यात येते. त्यानंतर संबंधित आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्यांच्या विभागात तो संदेश तातडीने पसरविणे आवश्यक आहे, तो मात्र त्यांच्यामार्फत वेळेत दिला जात नसल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले. वीज पडण्याची अर्धा ते दोन तास आधी माहिती मिळते. तीच माहिती तातडीने संबंधित विभागात दिल्यास प्रशासनाला दुर्घटना टाळणे शक्य होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मध्यंतरी राज्य स्तरावर कार्यशाळा घेण्यात आली होती. त्यामध्ये सर्व माहिती देण्यात आली होती. कोकणातून मात्र कोणीच आले नसल्याचेही डॉ.पवार यांनी
सांगितले.
वीज सेन्सर बसविलेल्या ठिकाणी नेटवर्क नसणे, लाइट जाणे अशा समस्या उद्भवतात. एका वेळी किमान १० सेन्सर सेंटर सुरू असणे महत्त्वाचे आहे, तसे झाल्यास अन्य कोणत्या ठिकाणी वीज पडणार हेही समजू शकते, असेही डॉ.पवार यांनी सांगितले.
>एसएमएसद्वारे देणार माहिती
भारतीय हवामान विभाग आणि भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे (विज्ञान मंत्रालय) यांच्या वतीने हे तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. अमेरिकेच्या वेदरबक या संस्थेने लायटनिंग लोकेशन नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले आहे, तर पोल्युशन कंट्रोल लिमिटेड या संस्थेने यंत्रणा बसवण्याचे काम हाती घेतले आहे. राज्यातील १६ ठिकाणी यंत्रणा बसवल्यानंतर पुण्यातील आयआयटीएम संस्था त्या त्या ठिकाणच्या वातावरणाचा अभ्यास करून तेथील हवामान शास्त्रज्ञ, सहायक शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांना एमएमएसद्वारे पूर्वसूचना देण्याचे काम करतात.
अशी आहे यंत्रणा
यंत्रणेला एक अँटेना आणि युजर जोडण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान २०० ते २५० कि.मी. अंतरावरील हवामानाची स्थिती, वीज किती क्षमतेने आणि कोणत्या ठिकाणी पडण्याची शक्यता आहे याची माहिती कळवणार आहे. पुणे येथील आयआयटीएम विभागाकडून हवामानाचा अभ्यास करून वीज पडण्याच्या अर्धा ते दोन तास पूर्वी पूर्वानुमान कळवण्यात येतो.
हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर
रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे वीज सेन्सर सेंटर उभारण्यात आले आहे. याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग अनभिज्ञ आहे. असे कोणते सेंटर उभारले आहे, याची माहिती अथवा पत्र आले नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: The power sensor center makes it easy to face the disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.