सत्तासंघर्ष : ठाकरे-शिंदे गटांनी दिली लेखी परीक्षा, निकाल बाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 08:01 AM2023-01-31T08:01:14+5:302023-01-31T08:01:47+5:30
Maharashtra Politics: शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार ? याबद्दल दावे व प्रतिदावे करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली
नवी दिल्ली : शिवसेना पक्ष व धनुष्यबाण निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार ? याबद्दल दावे व प्रतिदावे करण्याची प्रक्रिया संपुष्टात आली असून, आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे लेखी निवेदन सादर केलेली आहेत. दोन्ही गटांनीशंभरावर पानांची लेखी निवेदने सादर केली आहेत.
दोन्ही गटांनी निवडणूक आयोगापुढे तोंडी युक्तिवाद केल्यानंतर ३० जानेवारीपर्यंत लेखी निवेदन सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन्ही गटांनी लेखी निवेदन सादर केले आहेत. ठाकरे गटाने ऑनलाइन पद्धतीने हे निवेदन सादर केल्याची माहिती खासदार अनिल देसाई यांनी दिली.
२० लाख प्राथमिक सदस्य
n शिवसेनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था प्रतिनिधी सभा आहे. या सभेवर ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. यातील सदस्यांची प्रतिज्ञापत्रे जोडली आहेत.
n शिंदे गटाने शिवसेनेच्या घटनेची तोडमोड करून ‘मुख्य नेता’ हे घटनाबाह्य पद निर्माण केले आहे.
n राज्यघटनेच्या परिशिष्ट १० नुसार फुटीर गटाला नवा पक्ष किंवा राजकीय पक्षात विलीन होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया या फुटीर गटाने पूर्ण केलेली नाही.
ठाकरे गटाचे दावे
शिवसेना पक्षप्रमुख पद घटनेने व लोकशाही पद्धतीचा अवलंब करून निर्माण झाले आहे. यामुळे शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत.
त्यांचे आमदार व खासदार हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले.
शिंदे गटाचे दावे
मुख्य नेता पद हे घटनादुरुस्ती करून करण्यात आले असून, या पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. घटनेनुसार ही प्रक्रिया पार पडलेली आहे.
शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधी यांच्याकडे लाखो लोकांचा कौल आहे.
४ लाख सदस्य लोकप्रतिनिधींना पाठिंबा
n शिवसेना पक्षात अन्याय झाल्याने ४० आमदार बाहेर पडले आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वातील गट फुटीर नाही.
n हे आमदार महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या जनमताच्या कौलाने निवडून आलेले आहेत. जनमताच्या कौलावर निवडणूक आयोग राजकीय पक्षाची मान्यता ठरवितात. यानुसार शिंदे गट हाच शिवसेनेचा मूळ पक्ष आहे.
n उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुखपद हे घटनाबाह्य आहे.
निवडणूक आयोग कोणत्याही पक्षाची मान्यता हे लोकांनी दिलेल्या मतांवर अवलंबून असते. यामुळे खासदार व आमदारांना मिळालेल्या मतांचा पाठिंबा आम्हाला असल्याचा दावा शिंदे गटाने केल्याची माहिती खासदार राहुल शेवाळे यांनी केला.
शिंदे व त्यांचे साथीदार फुटून गेले. त्यामुळे तो ‘फुटीर गट’ आहे. प्रतिनिधी सभेतील बहुसंख्य सदस्य आमच्या बाजूने असल्याचा दावा ठाकरे गटाने केला.