‘राज्यात २० हजार मेगावॅटपेक्षा अधिक उच्चांकी वीजपुरवठा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 05:57 AM2018-05-27T05:57:20+5:302018-05-27T05:57:20+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवार, २५ मेपर्यंत तब्बल २०हजार ७४६ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली; आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल २३हजार ९८७ मेगावॅट विजेची मागणी होती.
मुंबई - यंदाच्या उन्हाळ्यात शुक्रवार, २५ मेपर्यंत तब्बल २०हजार ७४६ मेगावॅट विजेची उच्चांकी मागणी नोंदविण्यात आली; आणि महावितरणनेही या मागणीएवढाच वीजपुरवठा केला. मुंबईसह राज्यात शनिवारी तब्बल २३हजार ९८७ मेगावॅट विजेची मागणी होती. राज्यात कोणत्याही ठिकाणी भारनियमन न करता विजेची ही मागणी पूर्ण करण्यात आल्याचे महावितरणाकडून सांगण्यात आले.
राज्यात सध्या उष्णतेची लाट असल्याने विजेच्या मागणीतही विक्रमी वाढ होत आहे. राज्यात वितरण व पारेषण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणात सक्षमीकरण व आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच या यंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीची कामेही नियमितपणे करण्यात येत आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढत असतानाही यंदाच्या उन्हाळ्यात आतापर्यंत राज्याच्या कोणत्याही भागात वीजटंचाईमुळे भारनियमन करण्याची गरज उद्भवलेली नाही.
तसेच सध्या महावितरणला महानिर्मिती कंपनीकडून सुमारे ६हजार ७०० मेगावॅट वीज, केंद्रीय प्रकल्प तसेच दीर्घ व लघु मुदतीच्या कराराद्वारे सुमारे १०हजार २०० मेगावॅट वीज आणि इतर विविध स्त्रोतांकडून
सुमारे ३हजार ९०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे.