मुंबईच्या वेशीवर जोरदार शक्तिप्रदर्शन
By admin | Published: September 22, 2016 05:29 AM2016-09-22T05:29:11+5:302016-09-22T05:29:11+5:30
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गर्दीचे विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने मुंबईच्या वेशीवर विराट शक्तिप्रदर्शन केले.
पनवेल : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गर्दीचे विक्रम करणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाने मुंबईच्या वेशीवर विराट शक्तिप्रदर्शन केले. कोकणभवनवर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये रायगड व नवी मुंबईमधील चार लाखांपेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्याच्या इतिहासामधील सर्वात शिस्तबद्ध व विशाल मोर्चाचा नवीन विक्रम या आंदोलनाने प्रस्थापित केला आहे.
जगातील सर्वात मोठ्या शेतकऱ्यांच्या संपाची पार्श्वभूमी असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाने गर्दीचे आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले. मराठा क्रांती मूक मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामधून मराठा समाजातील नागरिक पहाटेपासूनच सेंट्रल पार्कमध्ये येऊ लागले होते. भगवे झेंडे व हाताला काळ्या फिती लावून बस, कार, टेम्पो, ट्रेनने नागरिक मोर्चाच्या ठिकाणी सहभागी होऊ लागले होते. १२ वाजता जवळपास चार लाख नागरिक सेंट्रल पार्कवरून महामार्गाच्या सर्व्हिस रोडवरून कोकणभवनकडे निघाले. कुठेही घोषणाबाजी नाही. नेत्यांची भाषणे नाहीत, नि:शब्द मोर्चातून मराठा समाजाने शिस्तीचे दर्शन घडविले. मोर्चामध्ये दोन वर्षांच्या मुलांपासून ८० वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्व नागरिक सहभागी झाले होते. सीबीडीमधील महाकाली चौकामध्ये कोपर्डीमध्ये हत्या झालेल्या तरुणीला श्रद्धांजली अर्पण करून चार मुलींनी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख यांना मागण्यांचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)
>मराठा क्रांती मोर्चाची वैशिष्ट्ये
मोर्चामध्ये चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांचा सहभाग नवी मुंबई, रायगडच्या इतिहासामधील सर्वाधिक गर्दी सीबीडी ते खारघरमध्ये दोन किलोमीटरची रांगप्रकल्पग्रस्तांचाही सहभाग दोन ते दहा वर्षे वयोगटातील मुलांचाही लक्षणीय सहभाग
महिलांची उपस्थिती लक्षणीय मोर्चासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी चाकरमान्यांनी घेतली सुटी या मोर्चानंतर स्वयंसेवकांनी पूर्ण मार्ग स्वच्छ केला
स्वयंशिस्तीचे पोलिसांनीही केले कौतुक
>सर्वपक्षीय नेते सहभागी : मोर्चामध्ये सर्वात पुढे निवेदन देणाऱ्या चार तरुणी, त्यांच्या पाठीमागे महिला व सर्वात शेवटी नेत्यांचा सहभाग होता. या मोर्चात आमदार शशिकांत शिंदे, भरत गोगावले, नरेंद्र पाटील, प्रवीण दरेकर, सुरेश लाडही एक नागरिक म्हणून सहभागी झाले होते. महिला व मुलांची संख्या लक्षणीय होती.