प्रबळ इच्छाशक्तीचा 'करिष्मा'! बारामतीच्या कन्येची 'नासा'मध्ये झेप
By admin | Published: April 6, 2016 08:01 AM2016-04-06T08:01:32+5:302016-04-06T08:15:53+5:30
सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर बारामती शहरातील करिष्मा सलाउद्दीन इनामदार या युवतीची थेट 'नासा'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे
Next
>बारामती, दि.६ : एका सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असतानाही प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर बारामती शहरातील करिष्मा सलाउद्दीन इनामदार या युवतीची थेट 'नासा'मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ती नासामध्ये रुजू झाली असून, आता तिथे राहूनच संशोधन करणार आहे.
करिष्मा ही एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबातील मुलगी आहे. इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत असताना तिच्या मनावर एका घटनेने मोठा प्रभाव निर्माण केला होता. एक फेब्रुवारी २00३ रोजी स्पेसशटल कोलंबियाला अपघात झाला. त्या अपघातात ७ अंतराळवीर मरण पावले होते. त्यांमध्ये होती एक भारतामध्ये जन्मलेली अमेरिकन अंतराळवीर कल्पना चावला. साहसी कल्पना चावलामुळे तिला स्फूर्ती मिळाली. लहानपणापासूनच तिचे अंतराळवीर शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न होते. या स्वप्नाचा तिने कधी विसर पडू दिला नाही. त्यामुळे लहानपणापासूनच करिष्माचा 'स्पेस' प्रवास सुरू झाला, असे तिचे वडील सलाउद्दीन इनामदार यांनी सांगितले.
लहानपणापासून तिने पुण्यातील काही अंतराळ क्लबमध्ये भाग घेतला. आयुकात जाऊन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भेटून त्यांचे मार्गदर्शन घेतले. तिने डिप्लोमा व डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून केली. स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे परदेशात एम.एस. करण्याची इच्छा प्रकट केली.
तिने फ्रान्समधील स्ट्रॅसबर्ग स्पेस विद्यापीठात एम.एस.साठी अर्ज केला. सप्टेंबर २0१४मध्ये १३ लाख रुपये शिष्यवृत्ती विद्यापीठाने देऊ केली. एम..एस. करण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च येणार होता. वेळ अतिशय कमी होता., पैसे जमविणे अत्यंत बिकट होते. तिच्या वडिलांनी स्वत:चा २ गुंठय़ांचा प्लॉट विकून तिच्या शिक्षणाची व्यवस्था केली. सप्टेंबर २0१४मध्ये ती फ्रान्स येथील विद्यापीठात एम.एस. साठी रुजू झाली. इथे उच्च शिक्षण घेताना तिला र्जमनी, लुक्झेंबर्ग, नेदरलँड्स, रशिया आणि अजून ६ देशांत जाण्याची संधी मिळाली. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला रिसर्च असोसिएट या पदासाठी नासाच्या एम्स रिसर्च सेंटर या संशोधन केंद्रात (अमेरिका) जाण्याची संधी मिळाली आहे. ६ महिने राहून तिने नासातील अंतराळ संशोधन केले आणि नासामधील दिग्गज शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मिळाले, असे इनामदार यांनी सांगितले.
अंतराळातील ज्ञानाचा उपयोग भारतातील विद्यार्थ्यांना व्हावा, यासाठी तिने अमेरिकेतील नॅशनल स्पेस सोसायटीच्या मदतीने देशात एनएसएस चॅप्टर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामची स्थापना केली आहे.
नासामध्ये काम करताना वर्णभेद, जात विसरून सगळेजण मानव कल्याणासाठी योगदान देत असतात. ही कार्यपद्धती मला खूप भावते., असे करिष्माने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.