प्रभा अत्रेंनी नाकारला ‘स्वरभास्कर’

By admin | Published: May 30, 2015 01:02 AM2015-05-30T01:02:26+5:302015-05-30T01:02:26+5:30

एक ‘पुणेकर’ असूनही गेल्या ८३ वर्षांच्या काळात महापालिकेने कोणताच सन्मान किंवा कौतुक केले नाही. उलट ‘स्वरभास्कर’ पुरस्कार मला कोणतीही पूर्वकल्पना न देता जाहीर केला.

Prabha Atrei denied 'Swarbhaskar' | प्रभा अत्रेंनी नाकारला ‘स्वरभास्कर’

प्रभा अत्रेंनी नाकारला ‘स्वरभास्कर’

Next

पुणे : एक ‘पुणेकर’ असूनही गेल्या ८३ वर्षांच्या काळात महापालिकेने कोणताच सन्मान किंवा कौतुक केले नाही. उलट ‘स्वरभास्कर’ पुरस्कार मला कोणतीही पूर्वकल्पना न देता जाहीर केला. या पुरस्कार वितरण समारंभाला विलंब झाल्याप्रकरणी माझ्यावरच ठपका ठेवत विनाकारण मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. आपल्याच माणसांकडून झालेला हा अपमान सहन न झाल्यामुळे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांनी शुक्रवारी जाहीर केला.
स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्याविषयी नितांत आदर आहे. पण समारंभाच्या मुद्द्याला सार्वजनिक स्वरूप दिल्यामुळे नाइलाजास्तव हा पुरस्कार स्वीकारणार नसल्याचे पत्र त्यांनी महापौरांना पाठविले आहे.
महापालिकेकडून ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर केलेल्या स्वरभास्कर पुरस्काराचे वितरण करण्यास स्वत: अत्रे यांनी घातलेल्या विविध अटींमुळेच विलंब होत असल्याचे स्पष्टीकरण महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. या गोष्टींमुळे दुखावलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांनी ‘लोकमत’शी बोलताना याविषयी नाराजी व्यक्त करीत, स्वत:वरचा दोष टाळण्यासाठी माझ्यावर विलंबाचे खापर फोडत असल्याचे सांगितले होते.
पत्रामध्येही त्यांनी याच गोष्टींचा पुनरुच्चार केला आहे. पुरस्कार वितरणाला विलंब होत असल्याबाबत महापौरांनी दिलेली माहिती चुकीची, दिशाभूल करणारी आणि नाहक बदनामी करणारी असल्याचे सांगून, हा पुरस्कार आपण नाकारत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या संदर्भातील संपूर्ण खासगी ई-मेल पत्रव्यवहार सार्वजनिक करण्यात आला याबाबत संताप व्यक्त करीत पालिकेकडून झालेला हा व्यवहार केवळ अपरिपक्व, बेजबाबदारच नाहीतर अनैतिकही असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.
आयोजनात अडचणी येत असतील तर हा पुरस्कार घरी आणून दिला तरी चालेल, असेही सांगितल्याचे त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)

पालिकेचा ढिसाळ कारभार, पुरस्कार वितरण समारंभ आणि पुरस्कारार्थी या दोघांची प्रतिष्ठा लक्षात न घेता समारंभ उरकून टाकण्याच्या मानसिकतेमुळे कार्यक्रमाला विलंब लावला. कार्यक्रमासंदर्भात आपणच सातत्याने महापालिका कार्यालय आणि महापौरांशी पाठपुरावा केला; मात्र कुणाकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. यातच समारंभासाठी पाहुण्यांची नावे सुचविण्यामागे केवळ पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दर्जेदार व्हावा इतकाच हेतू होता.
-प्रभा अत्रे

उपमहापौर आबा बागुल यांनी, महापालिकेकडून पुरस्कार देण्यास उशीर होत असल्याने, आपण वैयक्तिक पुरस्कार देऊ असे पत्र मला दिले होते. पुरस्काराला उशीर केला जात आहे, असेच समोर येत असल्यामुळे माध्यमांनी विचारल्यानंतर डॉ. प्रभा अत्रे यांच्याशी महापौर कार्यालयाने केलेला पत्रव्यवहार उघड करण्यात आला. ठरावीक व्यक्तीच्याच हस्ते पुरस्काराचे वितरण केले जावे असा त्यांचा आग्रह होता. महापालिकेने त्यादृष्टीने प्रयत्नदेखील केला होता. डॉ. अत्रे यांनी हा पुरस्कार घ्यावा यासाठी त्यांना विनंती करण्यात येणार असल्याचे महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सांगितले.

स्वरभास्कर हा सन्मानाचा पुरस्कार आहे, जे काही अजाणतेपणाने आणि गैरसमजुतीतून घडले त्याबद्दल पुणेकरांच्या वतीने ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांची जाहीर माफी मागू. ज्यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार हवा आहे त्यांच्याच हातून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या खूप महान कलाकार आहेत. त्यामुळे त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा यासाठी घरी जाऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाईल. दोन वर्षांपासून हा पुरस्कार सुरू आहे. त्याला खीळ बसू नये. रीतसर व्यासपीठावर बसूनच त्यांना हा पुरस्कार दिला जाईल, असे उपमहापौर आबा बागुल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Prabha Atrei denied 'Swarbhaskar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.